नवी दिल्ली : अल्फाबेटची कंपनी गुगल आपल्या डिजिटल सहाय्यक, हार्डवेअर आणि अभियांत्रिकी विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनीच्या खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे ब्लूमबर्गच्या अहवालातून समोर आले आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांमध्ये व्हॉइस-आधारित गुगल असिस्टंट आणि ऑगमेंटेड रिॲलिटी हार्डवेअर टीममधील लोकांचा समावेश आहे. याशिवाय गुगलच्या सेंट्रल इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशनच्या कर्मचाऱ्यांनाही कामावरून कमी करण्याचा फटका बसला आहे. ब्लूमबर्गच्या अहवलानुसार, गुगलच्या प्रवक्त्याने निवेदनात म्हटले की, २०२३ च्या उत्तरार्धात आमच्या अनेक विभागांनी अधिक कार्यक्षम होण्यासाठी आमच्या संसाधनांना आमच्या सर्वात मोठ्या उत्पादन प्राधान्यांनुसार संरेखित करण्यासाठी बदल केले आहेत. गुगलचे म्हणणे आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाक आहे त्यांना त्यासंबधी नोटीस मिळणे सुरू झाले आहे.