
असनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात दाखल झाल्यानंतर त्याचा परिणाम जाणवू लागला असून ओडिशा, बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये वादळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मात्र, हे वादळ किनाऱ्यावर येताना कमजोर होत जाईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे मोठी हानी होण्याची शक्यता नसली तरी वादळी पाऊस किनारी भागाला झोडपून काढणार आहे.
बंगालच्या उपसागरात ज्या वेगाने हे वादळ दाखल झाले त्यावरून बंगाल आणि ओडिशामध्ये ९० ते १२५ किमी/ताशी या वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याचदरम्यान वादळी पाऊसही पडेल. ओडिशाव्यतिरिक्त, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळ असनीचा प्रभाव दिसून येईल.
मान्सूनवर परिणाम नाही
या चक्रीवादळामुळे तूर्तास मान्सूनच्या भारतातील आगमनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.