
नवी दिल्ली : भारताच्या १६८७ लक्ष्मीपुत्रांकडे १६७ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती भारताच्या एकूण विकास दराच्या (जीडीपी) निम्मी आहे. ‘एम ३ एम’ हुरुनने भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर केली. या यादीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब अव्वल स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती ९.५५ लाख कोटी रुपये आहे. तर गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब ८.१५ लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
झेप्टो क्विक कॉमर्स स्टार्टअपचा सहसंस्थापक असलेला कैवल्य वोहरा हा सर्वात कमी वयाचा श्रीमंत ठरला आहे. त्याचा भागीदार आदित पालीचा २३ वर्षांचा आहे. दोघे मिळून ५.९ अब्ज डॉलर्सचे स्टार्टअप चालवतात. पालीचा हा या यादीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण व्यक्ती आहे.
वोहराने अवघ्या २२ व्या वर्षी ४४८० कोटींची वैयक्तिक संपत्ती निर्माण केली आहे. या यादीतील श्रीमंतांची सरासरी वयोमर्यादा ६५ वर्षे आहे.
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा पुन्हा अब्जाधीश बनले असून, त्यांची संपत्ती १५,९३० कोटी रुपये आहे.
परप्लेक्सिटी एआयचे संस्थापक अरविंद श्रीनिवास २१,१९० रुपयांच्या संपत्तीसह सर्वात कमी वयाचे अब्जाधीश ठरले आहेत. त्यांचे वय ३१ वर्षे आहे. देशातील अब्जाधीशांची संख्या आता ३५० वर गेली आहे. १३ वर्षांपूर्वी ही यादी सुरू झाल्यापासून अब्जाधीशांच्या संख्येत सहापट वाढ आहे.
मुंबईतून सर्वाधिक ४५१ श्रीमंतांचा समावेश
या वेळी १६८७ श्रीमंतांचा समावेश या यादीत केला आहे. त्यांची संपत्ती हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यात २८४ नवे चेहरे आहेत. मुंबईतून सर्वाधिक ४५१ लोकांचा समावेश झाला आहे. त्यानंतर दिल्ली (२२३) आणि बेंगळुरू (११६) यांचा क्रम लागतो. या यादीत १०१ महिला आहेत.
शाहरुख खान पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या यादीत
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान १२,४९० कोटी रुपयांच्या संपत्तीसह पहिल्यांदाच अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.
२०१२ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झाली यादी
एम ३ एम हुरुन इंडिया रिच लिस्ट हा एक संयुक्त उपक्रम आहे. जो २०१२ पासून सुरू आहे. यात भारतातील हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या लोकांची वार्षिक यादी प्रसिद्ध केली जाते. हुरुन रिपोर्ट हा श्रीमंतांच्या यादी बनवतो. त्याची स्थापना १९९९ मध्ये ब्रिटिश उद्योजक रुपर्ट हूगेवर्फ यांनी लंडनमध्ये केली होती. सुरुवातीला चीनमधील श्रीमंतांवर लक्ष केंद्रित केले गेले, मात्र २०१२ मध्ये भारत आवृत्ती सुरू झाली. भारत आवृत्तीचे प्रमुख अनस रहमान जुनैद आहेत.