हैदराबाद: माधापूर येथील नोव्होटेल हॉटेलमध्ये बाऊन्सर म्हणून काम करणाऱ्या तारक राम (वय-३०) याचा बुधवारी (२४ जानेवारी) हैदराबादच्या ज्युबली हिल्स परिसरात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. तो दुचाकीवरून आपला सहकारी राजू याच्यासोबत जात असताना भरधाव वेगात आलेल्या स्पोर्ट्स कारने त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात तारक रामच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला, तर राजू गंभीर जखमी झाला.
अपघात सीसीटीव्हीत कैद
हा अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तारक राम बुधवारी पहाटे ज्युबली हिल्स येथील पेड्डम्मा मंदिराच्या परिसरातून राजूसोबत दुचाकीवरून घरी परत जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव स्पोर्ट्स कारने त्यांना धडक दिली. यामुळे तारक हवेत फेकला गेला आणि खाली कोसळला. या धडकेमुळे तारक राम २० फूट हवेत फेकला गेला आणि तो सुमारे १०० मीटर अंतरावर कोसळला. तर, कारचालक फरार झाला.
हिट अँड रनचा गुन्हा दाखल
ज्युबली हिल्स पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला असून संबंधित कारला नंबर प्लेट नव्हती असे समोर आले आहे. विशेष पथक सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या घटनेचा तपास करत आहे.
कुटुंबीयांचा संताप-
तारक रामच्या कुटुंबीयांनी, "12 तास होऊन गेले आणि तुम्ही अजून काहीच केले नाहीत!" असा जाब ज्युबिली हिल्स पोलिसांना विचारला. त्यांनी तारक रामचा मृतदेह घेऊन पोलिस ठाण्यात निदर्शने केली. अपघाताचे ठिकाण माहित असूनही पोलिसांना अद्याप वाहनाची ओळख पटवण्यात यश आलेले नाही. ती काळ्या रंगाची ऑडी कार असावी आणि घटनेत एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचा सहभाग असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. परिसरात अनेक सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही कार मालकाचा शोध घेण्यास उशीर होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. तारकचे २ वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याला ११ महिन्यांचा मुलगा आहे.
दरम्यान, पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता सखोल तपास करून लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडावे अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.