
हैदराबादच्या खैरताबाद येथील ३७ वर्षीय मोहम्मद अहमद या व्यक्तीला नोकरीच्या बहाण्याने फसवून रशियात पाठवण्यात आले असून, त्याला युक्रेनविरुद्धच्या युद्धात लढण्यासाठी बळजबरीने नेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
“त्याला बंदूक देऊन युद्धासाठी पाठवण्यात आलं आहे. त्याचं शेवटचं ठिकाण युक्रेन सीमेच्या जवळ असल्याचं समजतं. आमची सरकारकडे मागणी आहे की त्याला मदत करून भारतात परत आणावं,” असं अहमदची पत्नी फिरदौस बेगम यांनी गुरुवारी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला सांगितलं.
युक्रेन सीमेकडे नेताना लष्करी वाहनातून उडी मारली
अहमद हैदराबादमध्ये बाऊन्सर म्हणून काम करत होता. मुंबईतील एका एजंटने त्याला रशियातील बांधकाम कंपनीत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं. त्यानुसार अहमद २५ एप्रिल रोजी रशियाला गेला. “अहमद रशियात गेल्यानंतर जवळपास एक महिना त्याला कोणतंही काम देण्यात आलं नाही. नंतर माझ्या पतीसह सुमारे ३० जणांना एका दुर्गम भागात नेऊन जबरदस्तीने शस्त्र प्रशिक्षण देण्यात आलं. यामध्ये सहा भारतीय नागरिक होते. प्रशिक्षणानंतर २६ जणांना युक्रेन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी सीमेवर नेण्यात आलं. सीमेकडे नेत असताना माझ्या पतीने लष्करी वाहनातून उडी मारली,” असं फिरदौस बेगम म्हणाल्या.
युद्धात सहभागी न झाल्यास ठार मारण्याची धमकी
लष्करी वाहनातून उडी मारल्यामुळे अहमदचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. तरीसुद्धा वरिष्ठांनी त्याला युद्धात जायलाच लागेल, अशी बळजबरी केल्याचं बेगम यांनी सांगितलं. काही महिन्यांपर्यंत अहमदने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविषयी काहीही सांगितलं नव्हतं. पण अलीकडेच त्याने कुटुंबाशी संपर्क साधून सर्व परिस्थिती कथन केली. त्याला दहा दिवस शस्त्र वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात आल्याचं समजतं. “माझ्या पतीने सांगितलं की, त्यांच्या गटातील सुमारे १७ जणांचा युक्रेन सैन्याशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. त्याला युद्धात सहभागी न झाल्यास ठार मारण्याची धमकी दिली जात आहे,” असे त्यांनी पुढे सांगितले. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना दिलेल्या निवेदनात फिरदौस बेगम यांनी आपल्या पतीला भारतात परत आणण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी हैदराबादमधील आणखी एका तरुणाला अशाच प्रकारे नोकरीच्या बहाण्याने रशियात पाठवण्यात आलं होतं आणि तो युक्रेनमध्ये झालेल्या युद्धात ठार झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारने अशाच प्रकरणातील दुसऱ्या एका तरुणाला सुरक्षित परत आणण्यात यश मिळवलं होतं.