पॉर्न-व्यसनी बापाने बलात्काराच्या प्रयत्नानंतर मुलीला संपवलं; स्वतःच पोलिसांत केली 'मिसिंग'ची तक्रार, झाली अटक

"मुलीचा शोध लागला की नाही याबाबत माहिती घेण्यासाठी तो जेव्हा केव्हा पोलिस स्टेशनमध्ये येत असे तेव्हा त्याला अश्रू अनावर होत असे," असे पोलिसांनी सांगितले.
पॉर्न-व्यसनी बापाने बलात्काराच्या प्रयत्नानंतर मुलीला संपवलं; स्वतःच पोलिसांत केली 'मिसिंग'ची तक्रार, झाली अटक

हैदराबाद, तेलंगणा : पोटच्या १३ वर्षांच्या मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्यावर मुलीने प्रतिकार केल्यामुळे तिची हत्या करणाऱ्या नराधम पित्याला बुधवारी (१९ जून) मियापूर पोलिसांनी बेड्या घातल्या.

पोलिसांनी सांगितले की, ३५ वर्षीय आरोपी डिलिव्हरी एजंट असून त्याला पॉर्न व्हिडिओ बघण्याचे व्यसन होते, त्याच प्रभावाखाली त्याने हा गुन्हा केला. कहर म्हणजे मुलीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःच ७ जून रोजी मियापूर पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर १३ जून रोजी मियापूर येथील जंगलात मुलीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. त्यामुळे अपहरण आणि हत्येची घटना असल्याचे मानून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तेव्हा, सीसीटीव्ही फूटेजद्वारे आरोपी पिताच मुलीसह जंगलात गेला होता आणि एकटाच बाहेर आल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पित्याला ताब्यात घेतले असता चौकशीत त्याने मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आणि या धक्कादायक घटनेचा खुलासा झाला.

माहितीनुसार, मूळ महबूबाबाद जिल्ह्यातील कुटुंब १ जून रोजी रोजीरोटीसाठी शहरात स्थलांतरित झाले आणि मियापूर येथील नदीगड्डा-ठंडा येथे राहू लागले. मुलीची आई रोजंदारीवर काम करते. तर नराधम बाप डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. ७ जून लाकडे गोळा करण्याच्या बहाण्याने तो मुलीला निर्जनस्थळी घेऊन गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. नदीगड्डा-ठंडाच्या पलीकडे जंगलात पोहोचल्यावर त्याने मुलीकडे शारीरीक संबंधांची मागणी केली. जेव्हा मुलीने विरोध केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिच्या चेहऱ्यावर पूर्ण ताकदीने वार केले. ती बेशुद्ध पडल्यावर त्याने तिचा गळा दाबला आणि नंतर ती मेली आहे याची खात्री झाल्यावर तिथून पळ काढला.

घरी आल्यावर कपडे बदलून तो पत्नी ज्या ठिकाणी काम करते तेथे पोहोचला आणि मुलगी बेपत्ता असल्याचे तिला सांगितले. नंतर पोलिसांच्या तपासाची दिशा भरकटवण्यासाठी स्वतःच पोलिस ठाण्यात जाऊन मुलगी हरवल्याची तक्रारही दिली. "मुलीचा शोध लागला की नाही याबाबत माहिती घेण्यासाठी तो जेव्हा केव्हा पोलिस स्टेशनमध्ये येत असे तेव्हा त्याला अश्रू अनावर होत असे," असे पोलिसांनी सांगितले. "सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यावर संशयावरून त्याची चौकशी केली असता त्याने मुलीची हत्या केल्याचे कबूल केले. त्या व्यक्तीला पॉर्न पाहण्याचे व्यसन आहे आणि त्याला मुलीसोबत शारीरीक संबंध बनवायचे होते,” असे तपास पथकाचे नेतृत्व करणारे निरीक्षक व्ही दुर्गा रामा लिंगा प्रसाद यांनी सांगितले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in