९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखांना विकले; सिकंदराबादमधील एका ‘सरोगसी रॅकेट’चा पोलिसांनी केला पर्दाफाश

सिकंदराबादमधील एका ‘सरोगसी रॅकेट’चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हैदराबाद पोलिसांनी रेजिमेंटल बाजार येथील युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरवर छापा टाकला होता.
९० हजारांत घेतलेले बाळ ३५ लाखांना विकले; सिकंदराबादमधील एका ‘सरोगसी रॅकेट’चा पोलिसांनी केला पर्दाफाश
Published on

हैदराबाद : सिकंदराबादमधील एका ‘सरोगसी रॅकेट’चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हैदराबाद पोलिसांनी रेजिमेंटल बाजार येथील युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरवर छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांना असे आढळून आले की, एक बाळ एका गरीब कुटुंबातून विकत घेण्यात आले होते आणि ते २०२४ मध्ये आयव्हीएफ उपचार घेत असलेल्या एका दाम्पत्याला देण्यात आले. पण ज्यावेळी डीएनए चाचणी करण्यात आली तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, सदर क्लीनिकने संबंधित दाम्पत्याने बाळासाठी सरोगसीचा पर्यायचा सल्ला दिला. त्यांना असेही सांगण्यात आले होते की हे बाळ‍ जैविकदृष्ट्या त्यांचे असेल. त्यासाठी त्यांच्याकडून ३५ लाख रुपये घेण्यात आले. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी रविवारी आठ जणांना अटक केली. त्यात मुख्य संशयित आरोपी युनिव्हर्सल सृष्टी फर्टिलिटी सेंटरच्या डॉ. अथलुरी नम्रता (६४), राज्य सरकारच्या गांधी रुग्णालयातील भूलतज्ज्ञ डॉ. नारगुला सदानंदम (४१) आणि एजंट आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.

प्रकरण काय?

सरोगसीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणे आणि बाळ विक्रीच्या रॅकेट प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदण्यात आला आहे. सृष्टी फर्टिलिटी सेंटरचा परवाना २०२१ मध्येच रद्द केला होता. पण डॉ. नम्रता हे सेंटर बेकायदेशीरपणे चालवत असल्याचो पोलीस तपासात आढळून आले आहे. त्या हैदराबादमधील कोंडापूर, विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथे आणखी तीन सेंटर्स चालवत होत्या. रविवारी या सर्व सेंटर्सवर छापेमारी करण्यात आली. हे एकच नाही तर अशी अनेक प्रकरणे असू शकतात. आम्ही फर्टिलिटी सेंटरच्या विविध शाखांमध्ये सरोगसी आणि आयव्हीएफ उपचार घेत असलेल्या इतर जोडप्यांचीही चौकशी करत आहोत, असे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in