भारतात ‘हायपरलूप’ ट्रेन शक्य नाही ;नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांचे मत

भारतात ‘हायपरलूप’ ट्रेन शक्य नाही ;नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांचे मत

पुढील वर्षीपासून भारतात काही औद्योगिक समूह मोठ्या प्रमाणावर लिथियम बॅटरी उत्पादनात पुढे येऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : हायपरलूप तंत्रज्ञानाचा काही वर्षांपूर्वी जगभरात बोलबाला होता. यामुळे मुंबई-पुणे अंतर अवघ्या २० मिनिटांत कापले जाऊ शकते, अशा वदंता होत्या. आता ही हायपूरलूप ट्रेन भारतात शक्य नाही, असे स्पष्ट प्रतिपादन नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी व्यक्त केले.

भारतात वेगवान रेल्वेसाठी हायपूरलूप तंत्रज्ञान वापरण्याची शक्यता नाही. कारण हे तंत्रज्ञान अजूनही बाल्यावस्थेत आहे. तसेच ते आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही, असे ते म्हणाले. व्हर्जिनच्या हायपूरलूप तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्यासाठी सारस्वत यांच्या अध्यक्षतेखाली समिती बनवली होती. काही परदेशी कंपन्यांनी भारतात हे तंत्रज्ञान सुरू करण्याची तयारी दर्शवली होती. परदेशातून जे प्रस्ताव हायपरलूपबाबत आले ते व्यवहार्य नाही.

सारस्वत म्हणाले की, आम्ही सध्या या तंत्रज्ञानाला जास्त महत्त्व दिले नाही. हा केवळ अभ्यास कार्यक्रम आहे. हायपरलूप तंत्रज्ञान आमच्या परिवहन क्षेत्रात येईल, असे वाटत नाही. हे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे. आम्ही या तंत्रज्ञानात गुंतवणूक करू शकत नाही.

हायपरलूप म्हणजे काय?

हायपरलूप ही ‘हायस्पीड’ ट्रेन आहे, जी ट्युबमध्ये व्हॅक्यूमवर चालते. हे तंत्रज्ञान टेस्ला व स्पेक्स एक्सच्या ॲॅलन मस्कने प्रस्तावित केले. व्हर्जिन हायपरलूपची चाचणी २०२० मध्ये लासवेगासमध्ये ५०० मीटरच्या ट्रॅकवर झाली. यात एक भारतीय व अन्य प्रवासी होते. त्याचा वेग प्रति तास १६१ किमी होता.

बॅटरी उत्पादनात खासगी कंपन्यांनी पुढे यावे

लिथियम आयातीबाबत भारत अजूनही चीनवर अवलंबून आहे. त्यावर ते म्हणाले की, भारतात आजही लिथियम बॅटरीचे उत्पादन कमी आहे. अजूनही आपण चीन व अन्य स्रोतांवर अवलंबून आहे. चीनच्या बॅटऱ्या स्वस्त आहेत. भारतात बॅटरी उत्पादनासाठी खासगी कंपन्यांनी पुढे यावे. पुढील वर्षीपासून भारतात काही औद्योगिक समूह मोठ्या प्रमाणावर लिथियम बॅटरी उत्पादनात पुढे येऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in