
''जनादेश नम्रपणे स्वीकारतो, आशा आहे भाजपने निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करेल.'' दिल्ली निवडणुकीतील पराभवावर 'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक्स वर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली.
केजरीवाल म्हणाले, ''आम्ही जनतेचा जनादेश मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. या विजयाबद्दल मी भाजपचे अभिनंदन करतो आणि मला आशा आहे की ते लोकांनी ज्या आश्वासनांसाठी त्यांना मतदान केले आहे ती सर्व आश्वासने पूर्ण करतील. गेल्या १० वर्षांत आम्ही आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप काम केले आहे. आम्ही केवळ रचनात्मक विरोधी पक्षाची भूमिका बजावणार नाही तर लोकांमध्येही राहू आणि त्यांची सेवा करत राहू."
भाजपने दिल्लीत 27 वर्षानंतर ऐतिहासिक पुनरागमन केले आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील 'आप'ला हरवले. निवडणूक आयोगाच्या ताज्या ट्रेंडनुसार, भाजप 48 जागांवर आघाडीवर आहे, तर 'आप' 22 जागांवर आघाडीवर आहे.
नवी दिल्ली येथून अरविंद केजरीवाल यांना भाजपच्या प्रवेश सिंग (वर्मा) यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. तर उपमुख्यमंत्री आणि मनिष सिसोदिया यांना जंगपूरा मतदार संघातून भाजपच्या तरविंदर सिंह मारवाह यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. तर कालकाजी मतदार संघातून आतिशी यांचा निसटता विजय मिळवता आला. भाजपच्या रमेश बिधुरी यांचा त्यांनी पराभव केला.