
सचिन मीणाच्या प्रेमासाठी पाकिस्तानातून नेपाळच्या मार्गाने भारतात पळून आलेली सीमा हैदर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सीमा हैदर चर्चेत आहे. पण यावेळी कारण वेगळे आहे. लवकरच सचिन मीणा आणि सीमा हैदर यांच्या घरात पाळणा हालणार आहे.
रविवारी (दि.२ मार्च) नोएडाच्या रबूपुरा गावात सीमा हैदरच्या ओटीभरणीचा समारंभ धूमधडाक्यात पार पडला. सीमाने त्या सोहळ्याचे फोटो तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या कार्यक्रमात संपूर्ण कुटुंब आणि शेजार-पाजारच्या लोकांसह इतर पाहुणे मंडळीही उपस्थित होती.
"मला आधीच चार मुलं, पण पहिल्यांदाच..."
सीमा हैदरने ओटीभरणीच्या कार्यक्रमाआधी आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तिने सांगितले की, मला आधीच चार मुलं (पाकमधील पहिल्या पतीपासून) आहेत पण जीवनात पहिल्यांदाच ओटीभरणीचा समारंभ होणार आहे आणि मी तो पहिल्यांदाच पाहत आहे. मी याआधी कधीही हा समारंभ पाहिलेला नाही. जो आनंदोत्सव आज भारतात बघतेय...मी इतकी आनंदी देखील यापूर्वी कधी नव्हते, खाण्यापिण्यापासून डिजेपर्यंत सर्व व्यवस्था कार्यक्रमासाठी केलीये.
सीमाकडून समारंभास कोणाची हजेरी?
सीमाला सध्या नववा महिना चालू असून लवकरच त्यांच्या घरात पाळणा हलणार आहे. सीमा पाचव्यांदा आई बनणार आहे. असे असले तरी सचिनपासून होणारे हे तिचे पहिलेच अपत्य असणार आहे. ओटीभरणीच्या खास प्रसंगाचे व्हिडिओ सीमाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओत सुप्रीम कोर्टाचे वकील आणि सीमाचे मानलेले भाऊ एपी सिंह देखील दिसत आहेत. एपी सिंह यांनी सीमाच्या घरी येऊन ओटीभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्याबद्दल सीमा म्हणाली, ओटीभरणीचा कार्यक्रम मुलीच्या माहेरच्या लोकांनी करायचा असतो. पण माझा मानलेला भाऊ एपी सिंह याने आणि त्याच्या कुटुंबाने मला पूर्ण सन्मान दिला आणि हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमात महिलांनी पारंपारिक गाणी गायली आणि हा सोहळा सुंदर बनवला.
सचिन-सीमाची भेट कशी झाली?
सीमा हैदर आणि सचिन मीणा यांची लव्ह स्टोरी २०२३ मध्ये चर्चेत आली होती. पाकिस्तानची हद्द पार करत नेपाळच्या मार्गाने भारतात आलेली सीमा हैदर पब्जी (PUBG) गेमच्या माध्यमातून सचिनशी संपर्कात आली होती. गेम खेळताना त्यांचे एकमेकांवर प्रेम झाले होते.