
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कोणी उभे राहिले तर त्याच्याविरोधात आक्रमण होते. ईडी, सीबीआय सगळे पाठी लागतात. माझी ५५ तास चौकशी झाली; पण मला काही फरक पडत नाही. १०० तास चौकशी करा; पण आज आपण उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही. हा देश या देशातील जनतेचे भविष्य आहे. हा देश दोन उद्योगपतींचा नाही,” अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात रविवारी रामलीला मैदानावर मोदी सरकारविरोधात हल्लाबोल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राहुल म्हणाले की, “यूपीए सरकारच्या कार्यकाळात १० वर्षांत २७ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले; पण मोदी सरकारने आठ वर्षांत त्यांना पुन्हा गरिबीत ढकलले. देशाला मोदी मागे घेऊन जात आहेत, कमजोर करत आहेत. यूपीए सरकारने शेतकऱ्यांना ७० हजार कोटी रुपये दिले आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काळे कायदे केले.”
“बेरोजगारी, द्वेषामुळे देश कमजोर होतो; पण काँग्रेसचा कार्यकर्ताच देशाला वाचवू शकतो. काँग्रेसच देशाला प्रगतिपथावर आणू शकतो,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “हा देश सर्वांचा आहे. या देशातील नागरिकांनी आपले रक्त आणि घाम गळून देशाची प्रगती केली आहे; पण त्याचा फायदा आज काही निवडक लोकांनाच होत आहे. आपले संविधान हा देशाचा आत्मा आहे, तो वाचवण्याचे काम प्रत्येक भारतीयाला करावे लागेल. असे केले नाही तर हा देश टिकणार नाही. काँग्रेस ‘भारत जोडो’ यात्रा सुरू करत आहे. ही विचारधारेची लढाई आहे. काँग्रेस आणि देशातील सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन लढू,” असे आवाहनही त्यांनी केले.
अशोक चव्हाण पहिल्या रांगेत
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे पक्षात नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत येत होत्या; पण रविवारी काँग्रेसच्या दिल्लीतील जंतर मंतरवरील शिबिरात अशोक चव्हाण हे काँग्रेस नेत्यांच्या पुढच्या रांगेत बसले होते. चव्हाण यांनीही गेल्याच आठवड्यात ‘मी दिल्लीला काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीसाठी होणाऱ्या शिबिरात हजर राहण्यासाठी जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा तूर्तास थांबण्याची शक्यता आहे.