
नवी दिल्ली : लोकसभा सभागृहाचे कामकाज लोकशाहीविरोधी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्याबद्दल अप्रमाणित शेरेबाजी केली, असेही गांधी म्हणाले.
सभागृहाची प्रतिष्ठा अबाधित राहावी यासाठी कामकाजाच्या नियमांचे पालन करावे, अशी सूचना बिर्ला यांनी गांधी यांना केल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी वरील मत व्यक्त केले. अध्यक्षांनी हे निरीक्षण का नोंदविले त्याचे कारण त्वरित कळू शकले नाही.
बिर्ला यांनी आपल्याबद्दल शेरेबाजी केली आणि आपल्याला बोलण्याची संधी न देताच सभागृहाचे कामकाज तहकूब केले, असेही गांधी म्हणाले. अध्यक्ष आसनावरून उठले आणि निघून गेले, त्यांनी आपल्याला एक शब्दही बोलण्याची संधी दिली नाही. ते आपल्याबद्दल बोलत होते आणि ते आपल्याबद्दल काय बोलले तेच कळले नाही, असे ते म्हणाले.
सभागृहात लोकशाही पद्धतीला तिलांजली
त्यानंतर संसदेच्या संकुलात राहुल गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, विरोधी पक्षनेत्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे अशी परंपरा आहे, मात्र जेव्हा आपण बोलण्यासाठी उभे राहिलो तेव्हा आपल्याला बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही. सभागृहाचे कामकाज कोणत्या पद्धतीने चालविण्यात येत आहे, आम्हाला बोलण्याची संधी दिली जात नाही, आपण शांतपणे बसलो होतो, मात्र गेल्या सात-आठ दिवसात आपल्याला बोलण्याची संधीच देण्यात आली नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान कुंभमेळ्याबद्दल बोलले, मलाही बोलायचे होते, पण परवानगी देण्यात आली नाही, सभागृह पूर्णपणे लोकशाही पद्धतीने चालवले जात नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला.
नेमके काय झाले?
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना सभागृहाचे नियम पाळण्याचा सल्ला दिला होता. बिर्ला म्हणाले की, तुम्ही सर्वांनी सभागृहाचा दर्जा आणि शालीनता राखणे अपेक्षित आहे. सभागृहात अशा अनेक घटना माझ्या निदर्शनास आल्या आहेत, सदस्य आणि त्यांचे आचरण सभागृहाच्या उच्च परंपरेला अनुसरून नाही. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा पाळा. यावर राहुल गांधी यांना काही बोलायचे होते, मात्र सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यानंतर राहुल गांधी बाहेर आले आणि सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
७० खासदारांनी घेतली बिर्ला यांची भेट
तुम्ही माझ्याबद्दल शेरेबाजी केली आहे तेव्हा मलाही बोलण्याची संधी द्या, असे त्यांना सांगितले. परंतु ते एक शब्दही बोलले नाहीत आणि निघून गेले, सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची गरज नसतानाही त्यांनी कामकाज तहकूब केले, असे राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर लोकसभेतील काँग्रेसच्या जवळपास ७० खासदारांनी बिर्ला यांची भेट घेतली आणि राहुल गांधी यांना सभागृहात बोलण्याची परवानगी न दिल्याचा प्रश्न त्यांच्याकडे उपस्थित केला.