नवऱ्याला सोडेन,पण मोबाईला नाही!

रमाकांत नोकरीनिमित्ताने गुजरातमध्ये राहत असल्याने अनिता माहेरी असायची.
नवऱ्याला सोडेन,पण मोबाईला नाही!

सध्याच्या जीवनात प्रत्येकाला मोबाईलचे वेड लागले आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्यापैकी प्रत्येक जण मोबाईलच्या आहारी गेला आहे. मोबाईलच्या याच वेडापायी एका विवाहितेला वर्षभरातच आपला संसार मोडावा लागला आहे. मोबाईलच्या अतिवापराचे हे प्रकरण पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचले, पोलिसांनीही त्या विवाहितेची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण एक वेळ नवऱ्याला सोडेन, पण मोबाईल नाही, अशी भूमिका त्या महिलेने घेतल्यानंतर अखेर पंचायतीमध्ये या दोघांच्या नात्याचा फैसला लागला. पंचायतीद्वारे त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

गजपतपूर येथे राहणाऱ्या अनिताचे १० जून २०२१ला रमाकांतशी लग्न झाले होते. रमाकांत नोकरीनिमित्ताने गुजरातमध्ये राहत असल्याने अनिता माहेरी असायची. मात्र १५ दिवसांपूर्वी रमाकांत सुट्टी घेऊन आपल्या घरी परतल्यावर अनितासुद्धा सासरी परतली होती. मात्र इतक्या महिन्यानंतर नवरा घरी परतला असला तरी त्याच्याशी बोलण्याऐवजी ती सतत मोबाईलमध्ये व्यस्त असायची. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारी अनिता मोबाईलवरून अन्य कुणाशी बोलत बसायची. याच कारणावरून दोघांमधील भांडण विकोपाला गेल्यानंतर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला.

नवऱ्याने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यावर पोलिसांनीही विवाहितेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मोबाईलच्या आहारी गेलेल्या अनिताने मी एकवेळ पतीला सोडू शकते, पण मोबाईल नाही, हे ठामपणे पोलिसांना सांगितले. पोलिसांकडून या वादावर कोणताच तोडगा न निघाल्याने हे प्रकरण पंचायतीकडे सोपवण्याचा निर्णय दोन्हीकडच्या कुटुंबियांनी घेतला. अखेर पंचायतीमध्ये झालेल्या युक्तिवादानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, दोघांचाही प्रेमविवाह झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in