"देवा, आमची मदत कर"; बंगळुरूमध्ये IAF ऑफिसरवर हल्ला, पत्नीला शिवीगाळ; रक्तबंबाळ अवस्थेत सांगितली धक्कादायक घटना

अधिकाऱ्याची पत्नी स्वतः देखील हवाई दलात स्क्वॉड्रन लीडर आहेत. "आम्ही तुमचं रक्षण करतो आणि तुम्ही अशा पद्धतीने आमच्यावरच हल्ला करता? सैन्य, हवाई दल आणि नौदलातील एखाद्या व्यक्तीशी असं वागता का?" असे मी ओरडत असतानाही अजून लोक जमा झाले आणि त्यांनी आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली.
"देवा, आमची मदत कर"; बंगळुरूमध्ये IAF ऑफिसरवर हल्ला, पत्नीला शिवीगाळ; रक्तबंबाळ अवस्थेत सांगितली धक्कादायक घटना
Published on

कर्नाटकच्या बंगळुरूमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारतीय हवाई दलाचे एक अधिकारी आणि त्यांची पत्नी (ज्या स्वतः देखील हवाई दलात अधिकारी आहेत) विमानतळाकडे जात असताना, काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विंग कमांडर बोस यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली.

आपली पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता यांच्यासह कारमधून विमानतळावर जात असताना ही घटना घडल्याचा दावा विंग कमांडर बोस यांनी केला आहे. ते बंगळुरूमधील सी. व्ही. रमन नगर येथील डीआरडीओ कॉलनीमधून विमानतळावर जात होते. त्यांची पत्नी गाडी चालवत होती, तेव्हाच हा प्रकार घडला. घडलेल्या घटनेची माहिती देणारा एक व्हिडिओ बोस यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

गाडी अडवून केला हल्ला

अचानक मागून आलेल्या एक दुचाकीने आमची गाडी अडवली. त्या व्यक्तीने कन्नडमध्ये मला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याने माझ्या गाडीवरचा 'डीआरडीओ'चा स्टिकर पाहिला आणि 'तुम्ही डीआरडीओ वाले...' म्हणत माझ्या पत्नीला शिव्या दिल्या. ते अजिबात सहन न झाल्याने मी गाडीतून उतरलो आणि त्याच क्षणी त्या बाईकवाल्याने गाडीची किल्ली माझ्या कपाळावर मारली आणि रक्ताची धार सुरू झाली.

आम्ही तुमचं रक्षण करतो आणि तुम्ही आमच्यावरच हल्ला करता-

"मी तिथे उभा राहिलो आणि ओरडत होतो, 'आम्ही तुमचं रक्षण करतो आणि तुम्ही अशा पद्धतीने आमच्यावरच हल्ला करता? सैन्य, हवाई दल आणि नौदलातील एखाद्या व्यक्तीशी असं वागता का?' आश्चर्य म्हणजे, मी रागात ओरडत असताना अजून लोक जमा झाले आणि त्यांनी आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली. एका व्यक्तीने एक दगड उचलला आणि माझ्या गाडीवर मारण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्या डोक्याला लागला... ही आहे माझी अवस्था," असं तो अधिकारी व्हिडिओत बोलतो.

जर, कायदा मदतीला आला नाही, तर मी प्रतिकार करेन

"सुदैवाने, माझी पत्नी तिथे होती आणि तिने मला तिथून बाहेर काढलं. आम्ही पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, पण तिथून अजून काहीच प्रतिसाद नाही," असं त्यांनी पुढे सांगितलं. "कर्नाटकाची ही अवस्था झाली आहे — हीच खरी वस्तुस्थिती आहे. मला स्वतःला यावर विश्वास बसत नाही. देव आमची मदत कर. देवा मला प्रतिकार (बदला) न करण्याचं बळ देवो. उद्या जर कायदा आणि सुव्यवस्था आमच्या मदतीला आली नाही, तर मी प्रतिकार करेन," असंही त्यांनी गाडीत बसून हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना म्हटलं.

दरम्यान, हा हल्ला का झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, पोलिसांनी सांगितले की, अधिकाऱ्याने अद्याप अधिकृत तक्रार दाखल केलेली नसल्यामुळे आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. अधिकाऱ्याच्या पत्नीची ओळख पटली असून नेमकं काय घडलं याचा तपास सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in