एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही! हवाई दलाचे प्रमुख ए. पी. सिंग यांची नाराजी

सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषद २०२५ ला संबोधित करताना ए. पी. सिंग म्हणाले की, “सध्या युद्धाचे स्वरूप वेगाने बदलले आहे आणि ते अजूनही बदलत आहे. युद्ध आणि शांतता यांच्यातील रेषा अधिकाधिक अस्पष्ट होत चालल्या आहेत. दहशतवादी कृत्यांसारखे अपारंपरिक धोके व्यापक संघर्षात बदलू शकतात, हेसुद्धा आपल्याला माहीत आहे.”
एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही! हवाई दलाचे प्रमुख ए. पी. सिंग यांची नाराजी
Published on

नवी दिल्ली : संरक्षण यंत्रणेच्या खरेदी आणि वितरणातील विलंबाबद्दल एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी नाराजी व्यक्त केली. असा एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेला नाही. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी अशी आश्वासने देताच का? हे विचार करण्यासारखे आहे. बऱ्याचदा, करारावर स्वाक्षरी करताना, तो प्रकल्प वेळेवर पूर्ण होणार नाही, याची कल्पना आलेली असते. तरीही त्या करारावर स्वाक्षरी केली जाते, अशी खंत हवाई दलाचे प्रमुख ए. पी. सिंग यांनी व्यक्त केली.

सीआयआय वार्षिक व्यवसाय शिखर परिषद २०२५ ला संबोधित करताना ए. पी. सिंग म्हणाले की, “सध्या युद्धाचे स्वरूप वेगाने बदलले आहे आणि ते अजूनही बदलत आहे. युद्ध आणि शांतता यांच्यातील रेषा अधिकाधिक अस्पष्ट होत चालल्या आहेत. दहशतवादी कृत्यांसारखे अपारंपरिक धोके व्यापक संघर्षात बदलू शकतात, हेसुद्धा आपल्याला माहीत आहे.”

एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी याआधी ८ जानेवारी रोजी तेजस लढाऊ विमानांच्या वितरणात होणाऱ्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. “अद्याप ४० जेट विमाने हवाई दलाला देण्यात आलेली नाही. चीनसारखे देश आपली ताकद वाढवत आहेत. तेजस, एएमसीए आणि एमके२ ची डिलिव्हरी देखील उशिरा झाली आहे.” तेजस एमके१ए लढाऊ विमानांसाठी फेब्रुवारी २०२१ मध्ये एचएएलसोबत ४८,००० कोटी रुपयांचा करार करण्यात आला होता. मार्च २०२४ पासून डिलिव्हरी सुरू होणार होती, परंतु आजपर्यंत एकही विमान आलेले नाही. तेजस एमके२ चा प्रोटोटाइप अद्याप तयार झालेला नाही. ॲडव्हान्स्ड स्टील्थ फायटर एएमसीएकडे अद्याप प्रोटोटाइप नाही.

ऑपरेशन सिंदूर हा राष्ट्रीय विजय आहे

ऑपरेशन सिंदूर ही कारवाई दहशतवादाविरुद्ध देशाच्या एकतेचे आणि ताकदीचे प्रतीक आहे. या कारवाईअंतर्गत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले. तिन्ही सशस्त्र दले एकत्र आली अन् सर्वकाही स्वत:हून घडत गेले. आम्ही सत्याच्या मार्गावर चालत होतो. त्यामुळे देवही आमच्यासोबत होता. प्रत्येक भारतीयाला हा विजय हवा होता आणि तो या विजयाची वाट पाहत होता, असेही ए. पी. सिंग यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in