हवाई दलाचे विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू

हवाई दलाचे विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू

राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगडजवळ बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. या विमानात दोन वैमानिक होते. प्राथमिक माहितीनुसार...
Published on

जयपूर : राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगडजवळ बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. या विमानात दोन वैमानिक होते. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. हे विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले तिथे मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर धुराचे लोट पसरले, अशी माहिती स्थानिकांनी दिली. चुरुचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास चुरु जिल्ह्यातील भवाना बदावणे गावाजवळ भारतीय हवाई दलाचे एक जेट विमान कोसळल्याची घटना घडली.

भारतीय हवाई दलाचे हे जग्वार लढाऊ विमान दोन आसनी होते. या विमानाने सुरतगड हवाई तळावरून दोन वैमानिकांसह उड्डाण घेतले होते. या घटनेनंतर, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अपघातस्थळी पाठवण्यात आले आहेत, असे संरक्षण सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

यावर्षी जग्वार विमानाला झालेला हा दुसरा अपघात आहे. याआधी एप्रिलमध्ये गुजरातमधील जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ नियमित सरावादरम्यान भारतीय हवाई दलाचे एक जग्वार विमान कोसळले होते. हे विमान जामनगर शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावरील सुवर्दा गावाजवळ एका मोकळ्या जागेत कोसळले होते.

logo
marathi.freepressjournal.in