राजस्थानमध्ये IAF चे लढाऊ विमान Jaguar कोसळले; २ वैमानिक ठार, ५ महिन्यांतील तिसरी दुर्घटना

Jaguar कोसळल्याची माहिती IAF ने अधिकृत निवेदन जारी करुन दिली दिली आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती (Court of Inquiry) नेमण्यात आल्याचेही आयएएफने सांगितले.
राजस्थानमध्ये IAF चे लढाऊ विमान Jaguar कोसळले; २ वैमानिक ठार, ५ महिन्यांतील तिसरी दुर्घटना
Published on

भारतीय हवाई दलाचे (IAF) जॅग्वार हे लढाऊ विमान बुधवारी (दि. ९) दुपारी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील भानोदा गावाजवळ कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. गेल्या पाच महिन्यांत आयएएफचे लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त होण्याची ही तिसरी घटना आहे.

प्राथमिक माहितीनुसार, विमानाने दुपारी सुमारे १.२५ वाजता अचानक नियंत्रण गमावले आणि ते थेट शेतात कोसळले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. स्थानिकांनी आकाशातून प्रचंड आवाज ऐकल्याचे सांगितले. त्यानंतर शेताच्या दिशेने आगीच्या मोठ्या ज्वाळा व धुराचे लोट उठताना दिसले. अपघातानंतर आग लागली होती, जी स्थानिक नागरिकांनी स्वतः विझवण्याचा प्रयत्न केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

"भारतीय हवाई दलाचे (IAF) जग्वार विमान आज राजस्थानमधील चुरूजवळ नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान अपघातग्रस्त झाले. हे प्रशिक्षणासाठीचे विमान होते. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिकांचे दुर्दैवी निधन झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही", अशी माहिती IAF ने अधिकृत निवेदनात दिली आहे. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती (Court of Inquiry) नेमण्यात आल्याचेही आयएएफने सांगितले.

राजस्थानमधील जोधपूर आणि बीकानेर येथील हवाई तळांवरून आयएएफचे अनेक लढाऊ विमानं उड्डाण करतात. या दुर्घटनेमुळे हवाई दलातील लढाऊ विमानांच्या वाढत्या अपघातांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, चौकशी पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

logo
marathi.freepressjournal.in