IAF चे विमान कोसळले; वैमानिकासह ५ ठार, आसामच्या जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी लागली आग, अपघाताच्या चौकशीचे आदेश

आसामच्या जोरहाट येथील रौरिया एअरबेसवर शनिवारी सकाळी हवाई दलाचे एक विमान कोसळले.
IAF चे विमान कोसळले; वैमानिकासह ५ ठार, आसामच्या जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी लागली आग, अपघाताच्या चौकशीचे आदेश
IAF चे विमान कोसळले; वैमानिकासह ५ ठार, आसामच्या जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी लागली आग, अपघाताच्या चौकशीचे आदेश
Published on

जोरहाट : आसामच्या जोरहाट येथील रौरिया एअरबेसवर शनिवारी सकाळी हवाई दलाचे एक विमान कोसळले. या अपघातात वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू झाला असून एक सह-वैमानिक गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांचा समावेश आहे.

सदर विमान एअरबेसवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि त्याचे दोन तुकडे झाले. अपघातग्रस्त 'एएन-३२' हे एक मालवाहू विमान होते. त्याचा वापर सैन्य आणि मालसामान वाहून नेण्यासाठी केला जात होता. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही; हवाई दलाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय हवाई दलाने सांगितले की, हे विमान नियमित उड्डाणावर होते आणि प्राथमिक निष्कर्ष समोर येईपर्यंत कोणीही कोणताही तर्क-वितर्क काढू नयेत. एएन-३२ हे मालवाहू विमान डोंगराळ आणि दुर्गम भूप्रदेशांवरही उतरण्यास सक्षम आहे. भारतीय वायुसेनेकडे अंदाजे १०० अँटोनोव्ह एएन-३२ टॅक्टिकल ट्रान्सपोर्ट विमानांचा ताफा आहे. हवाई दलाने सुरुवातीला सोव्हिएत निर्मित अशी १२५ विमाने खरेदी केली होती. सध्या सेवेत सक्रिय असणाऱ्या य विमानांचा आकडा १०० च्या आसपास आहे. 'एएन-३२' ने १९८० पासून हवाई दलाच्या मीडियम-लिफ्ट वाहतूक क्षमतेचा कणा म्हणून काम केले आहे. उष्ण हवामान आणि हिमालयासारख्या उंच प्रदेशात ऑपरेशन दरम्यान त्याच्या मजबूतपणामुळे ते खूप महत्त्वाचे मानले जाते.

दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेणार

नवी दिल्ली : या दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी हवाई दलाने उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय हवाई दलाने 'एक्स'वर शेअर करत ही माहिती दिली आहे. हवाई दलाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जोरहाट येथे उतरण्याच्या प्रयत्नात असताना हवाई दलाच्या 'एएन-३२' या विमानाला अपघात झाला. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in