2016 मध्ये बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालेले भारतीय वायुसेनेचे AN-32 विमान सापडले!

टेक ऑफ झाल्यानंतर 16 मिनिटांनी पायलटने अखेरचा कॉल केला आणि "सर्व काही सामान्य आहे" असे सांगितले होते. पण,...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

2016 मध्ये बंगालच्या उपसागरावरून बेपत्ता झालेल्या भारतीय वायुसेनेच्या AN-32 विमानाचे अवशेष नुकतेच चेन्नई किनारपट्टीपासून 310 किलोमीटर अंतरावर सापडले आहेत. बेपत्ता विमानात 29 कर्मचारी होते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियन टेक्नॉलॉजीने विकसित केलेले ऑटोनॉमस युटिलिटी व्हेईकल (AUV), बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेण्यासाठी अलीकडेच लाँच करण्यात आले होते. मल्टी-बीम सोनार , सिंथेटिक अ‍ॅपर्चर सोनार आणि उच्च-रिझोल्यूशन फोटोग्राफी वापरून 3,400 मीटर खोलीवर शोध घेण्यात आला. छायाचित्रांमध्ये चेन्नई किनाऱ्यापासून सुमारे 310 किलोमीटर अंतरावर समुद्रतळाशी कोसळलेल्या विमानाचा ढिगारा कैद झाला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियन टेक्नॉलॉजीने तैनात केलेल्या AUV द्वारे टिपलेल्या प्रतिमांच्या छाननीत, चेन्नई किनारपट्टीपासून 310 किमी अंतरावर असलेले अवशेष AN-32 विमानाचे असल्याचे आढळून आल्याचे, संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. "शोध प्रतिमांची छाननी करण्यात आली आणि ती AN-32 विमानाशी सुसंगत असल्याचे आढळले. संभाव्य अपघातस्थळावरील हा शोध, त्याच भागात इतर कोणत्याही बेपत्ता विमानाच्या अपघाताचा इतिहास नसताना, हा ढिगारा कदाचित AN-32 चा असू शकतो,” असे मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे सांगितले.

खोल-समुद्री शोधातून मिळालेले निष्कर्ष-

छायाचित्रांचे विश्लेषण करण्यात आले आणि ते An-32 विमानाशी सुसंगत असल्याचे आढळले. त्या जागेवर किंवा त्या भागात इतर कोणतेही विमान कोसळले नसल्याचेही समोर आले. हा ढिगारा अपघातग्रस्त एन-32 विमानाचा असेल, असा विश्वास नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीनेही व्यक्त केला आहे.

22 जुलै 2016 रोजी काय घडले-

AN-32 विमानाने 22 जुलै 2016 रोजी सकाळी 8:30 वाजता चेन्नई येथील तांबरन हवाई तळावरून उड्डाण केले आणि 11. 45 च्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअर येथे उतरायचे होते. टेक ऑफ झाल्यानंतर १६ मिनिटांनी पायलटने अखेरचा कॉल केला आणि "सर्व काही सामान्य आहे" असे सांगितले होते. पण, चेन्नई किनाऱ्यापासून 280 किमी अंतरावर सकाळी 9:12 च्या सुमारास विमान 23,000 फूटावरून खाली आले आणि रडारवरून गायब झाले. विमान बेपत्ता झाल्यानंतर हवाई दल आणि नौदलाने समुद्रात बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी भारतातील सर्वात मोठे शोध आणि बचाव अभियान सुरू केले. पण, 15 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय वायुसेनेने अखेर AN-32 या विमानातील 29 जणांच्या कुटुंबीयांना पत्र लिहून सांगितले की, बेपत्ता विमान शोधण्यात ते अपयशी ठरले आहेत. विमानातील लोकांना मृत घोषित करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. विमानातील ब्लॅक बॉक्समध्ये पाण्याखालील लोकेटर 'बीकन' बसवलेले नव्हते, ज्यामुळे विमानाच्या अवशेषासाठी शोध मोहीम अत्यंत कठीण बनली होती. अखेर अपघातानंतर जवळपास आठ वर्षांनंतर, त्याच भागात किनार्‍यापासून 310 किमी अंतरावर अपघातग्रस्त विमानाचा ढिगारा सापडला आहे.

logo
marathi.freepressjournal.in