
मध्यप्रदेशमधील भिंड जिल्ह्यातील दीनदयाळ डांगरोलिया महाविद्यालयात घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. १ एप्रिल रोजी पदवीपूर्व परीक्षेदरम्यान भिंडचे जिल्हाधिकारी आणि आयएएस अधिकारी संजीव श्रीवास्तव यांनी एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे समाजमाध्यमांवर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.
FPJ ने दिलेल्या वृत्तानुसार, बीएससी दुसऱ्या वर्षाचा गणिताचा पेपर सुरू असताना श्रीवास्तव यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन रोहित राठोड या विद्यार्थ्याला अचानक मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला स्टाफरूममध्ये नेले आणि पुन्हा मारहाण केली. राठोडने माध्यमांशी बोलताना सांगितले, “ते आयएएस अधिकारी असल्याने मी काहीही बोलू शकलो नाही.”
दरम्यान, संजीव श्रीवास्तव यांनी आपल्या कृतीचे समर्थन करत NDTV ला सांगितले, “परीक्षा केंद्रात संघटित फसवणूक सुरू असल्याचे अहवाल मिळाल्याने मी हस्तक्षेप केला. प्रश्नपत्रिका बाहेर पाठवून, उत्तरे लिहून पुन्हा विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये पाठवले जात होते.”
ते पुढे म्हणाले की, “मी विद्यापीठाला पत्र लिहून या महाविद्यालयाचा भविष्यात परीक्षा केंद्र म्हणून वापर करू नये, अशी शिफारस केली आहे.”
NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने त्यांच्याबद्दल म्हटले होते की, 'अशा अधिकाऱ्याने क्षेत्रात राहावे की नाही हे मुख्य सचिवांनी ठरवावे.'
भिंडमध्ये तैनात तहसीलदार माला शर्मा यांनीही जिल्हाधिकारी श्रीवास्तव आणि एसडीएम पराग जैन यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात लिहिले आहे की, 'या छळामुळे मला काही झाले तर त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी संजीव श्रीवास्तव आणि गोहाड एसडीएम पराग जैन यांची असेल.'
सध्या परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, अशी मागणी विविध स्तरांवरून केली जात आहे.