देशातील दुर्मिळ रक्तदात्यांची होणार नोंदणी; आयसीएमआरचा निर्णय

इंडिया कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) अंतर्गत मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजीने (एनआयआयएच) प्रथमच देशातील दुर्मिळ आणि असामान्य रक्तगट असलेल्या रक्तदात्यांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. थॅलेसेमिया आणि सिकलसेल रोगासारख्या आजाराच्या वेळी रक्तसंक्रमणाची गरज असताना, ही नोंदणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
देशातील दुर्मिळ रक्तदात्यांची होणार नोंदणी; आयसीएमआरचा निर्णय
Published on

नवी दिल्ली : इंडिया कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) अंतर्गत मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजीने (एनआयआयएच) प्रथमच देशातील दुर्मिळ आणि असामान्य रक्तगट असलेल्या रक्तदात्यांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. थॅलेसेमिया आणि सिकलसेल रोगासारख्या आजाराच्या वेळी रक्तसंक्रमणाची गरज असताना, ही नोंदणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आता आयसीएमआर ही संस्था एनआयआयएचच्या मदतीने आरोग्य सेवा महासंचालकांशी (डीजीएचएस) याविषयी चर्चा करणार आहे. जेणेकरून रक्तपुरवठ्याशी संदर्भात माहिती देणाऱ्या ई-रक्तकोषला ही नोंदणी जोडता येईल, अशी माहिती नागपूरमधील आयसीएमआर-सेंटर फॉर रिसर्च मॅनेजमेंट अँड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनोपॅथीजच्या संचालिका डॉ. मनीषा मडकईकर यांनी दिली. या एकत्रीकरणामुळे दुर्मिळ रक्तगट असलेल्या लोकांना रक्तपेढ्यांचा शोध घेणे आणि रक्त मिळवणे सोपे होईल. यामुळे रक्तपेढ्यांना केंद्रीकृत प्रणालीद्वारे त्यांचा साठा आणि रक्तदात्यांचे व्यवस्थापन करण्यास देखील मदत होईल.

सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननुसार (सीडीएससीओ), १४२ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात ४,००० हून अधिक परवानाधारक रक्तपेढ्या आहेत. “गर्भधारणेदरम्यान रक्ताचे आजार आणि गुंतागुंतीचे प्रमाण जास्त असल्याने देशातील अनेक जण रक्तसंक्रमणावर खूप अवलंबून आहेत. थॅलेसेमियामुळे १ ते १.५ लाख रुग्णांना वारंवार रक्तसंक्रमणाची आवश्यकता असते, असे डॉ. मडकईकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, “भारतातील बहुतेक रक्तपेढ्यांमध्ये, लाल रक्तपेशी घटक जारी करण्यासाठी क्रॉस-मॅचिंग करण्यापूर्वी फक्त एबीओ आणि आरएचडी अँटीजेन्स जुळवले जातात. तथापि, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजनने ४७ रक्तगट प्रणालींमध्ये ३६० हून अधिक अँटीजेन्स ओळखले आहेत. रक्तपेढ्या नियमितपणे या किरकोळ रक्तगट अँटीजेन्सची चाचणी करत नाहीत.”

देशात अपघात, शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण

देशात सध्या दरदिवशी १२०० रस्ते अपघात होत असून त्यासाठी रक्ताची गरज अधिक भासते. तसेच देशात दरवर्षाला ६ कोटी शस्त्रक्रिया होत असून २४ कोटी महत्त्वाची ऑपरेशन्स पार पडतात. त्याचबरोबर ३३.१ कोटी कर्करोगपीडितांवर उपचार केले जातात, गर्भधारणेसंदर्भात १ कोटी गुंतागुंतीची प्रकरणे समोर येत आहेत. या सर्वांसाठी रक्त संक्रमाणाची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे.

logo
marathi.freepressjournal.in