कोवॅक्सिनवरील अभ्यास ICMR ने नाकारला; बीएचयूचा अभ्यास दिशाभूल करणारा असल्याचा निष्कर्ष

बीएचयूने कोव्हॅक्सिनसंदर्भातील अभ्यासात काढलेले निष्कर्ष भ्रामक आणि दिशाभूल करणारे असल्याचा निर्वाळा आयसीएमआरने दिला
कोवॅक्सिनवरील अभ्यास ICMR ने नाकारला; बीएचयूचा अभ्यास दिशाभूल करणारा असल्याचा निष्कर्ष

नवी दिल्ली : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) बनारस हिंदू विद्यापीठ (बीएचयू) यांच्या नेतृत्वाखालील कोवॅक्सिनवरील अलीकडील अभ्यास नाकारला आहे. त्यात दावा करण्यात आला होता की, कोवॅक्सिनमुळे स्ट्रोक आणि गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा दुर्मिळ धोका वाढला आहे. बीएचयूने कोव्हॅक्सिनसंदर्भातील अभ्यासात काढलेले हे निष्कर्ष भ्रामक आणि दिशाभूल करणारे असल्याचा निर्वाळा आयसीएमआरने दिला आहे.

आयसीएमआरने न्यूझीलंड-आधारित ड्रग सेफ्टी जर्नलच्या संपादकाला बीएचयूमधील लेखकांद्वारे अलीकडे प्रकाशित करण्यात आलेला कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबतचा अभ्यास मागे घेण्यासाठी पत्र लिहिले आहे. या पेपरमध्ये चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. आयसीएमआरचा या अभ्यासाशी संबंध नाही आणि संशोधनासाठी कोणतेही आर्थिक किंवा तांत्रिक सहाय्य दिलेले नाही, असे आयसीएमआरने पत्रात लिहिले आहे.

आयसीएमआरचे डीजी डॉ. राजीव बहल यांनी पत्रात म्हटले आहे की, आयसीएमआर या खराब पद्धतीने डिझाइन केलेल्या अभ्यासाशी संबंधित असू शकत नाही. डॉ. बहल यांनी अभ्यासाच्या लेखकांना आणि जर्नलच्या संपादकाला आयसीएमआरची पोचपावती काढून टाकण्यास आणि त्रुटी प्रकाशित करण्यास सांगितले आहे. त्यांनी अभ्यासाच्या लेखकांकडून त्यांच्याविरुद्ध आयसीएमआरने कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई का करू नये, यावर स्पष्टीकरण मागितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in