सेमीकंडक्टरचा प्लांट भारतात सुरू झाल्यास लाखाचा लॅपटॉप ४० हजारांत मिळेल - अनिल अग्रवाल

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, सध्या जगात डिस्प्ले हे तैवान व दक्षिण कोरियात बनतात
सेमीकंडक्टरचा प्लांट भारतात सुरू झाल्यास
लाखाचा लॅपटॉप ४० हजारांत मिळेल - अनिल अग्रवाल

भारतात सेमीकंडक्टर चीप व डिस्प्ले तयार होऊ लागल्यास १ लाखाचा लॅपटॉप ४० हजारांत मिळेल, असे प्रतिपादन वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी गुरुवारी केले.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, सध्या जगात डिस्प्ले हे तैवान व दक्षिण कोरियात बनतात. तेथून ते आयात करावे लागतात. भारतात ही उत्पादन बनू लागल्यानंतर त्याच्या किमती कमी होतील. सध्याचा काळ हा डिजिटल आहे. पैशाची देवाणघेवाण, कोणत्याही योजनेची माहिती, लहान मुलांचे, मोठ्यांचे शिक्षण आदींसाठी लॅपटॉप गरजेचा बनलेला आहे. सध्या कोणताही चांगला लॅपटॉप खरेदी करायचा असल्यास तो १ लाख रुपयांना मिळतो. येत्या काही काळात हाच लॅपटॉप ४० हजार रुपयांना मिळेल. सेमीकंडक्टर चीप भारतात बनू लागल्यानंतर अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या किमतींवर परिणाम होईल, असे ते म्हणाले.

सध्या सेमीकंडक्टर व डिस्प्ले हे परदेशात बनवले जातात. वेदांत व फॉक्सकॉनचा करार हा भारतात या वस्तू बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. वेदांत समूह १.५४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून भारतात आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल. या संयुक्त कंपनीत ६० टक्के भागीदारी वेदांतची तर ४० टक्के भागीदारी ही फॉक्सकॉनची असेल.

स्वतंत्र, व्यावसायिक सल्ल्यामुळेच गुजरातमध्ये गुंतवणूक

महाराष्ट्रातील सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकीय वादळ उठले आहे. मात्र, स्वतंत्र, व्यावसायिक सल्ल्यामुळेच गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यात आली, असे स्पष्टीकरण वेदांतचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिले.

वेदांत व आमची भागीदार कंपनी फॉक्सकॉन ही कंपनी महाराष्ट्रात प्रकल्प उभारण्याचा विचार करत होती. मात्र, अचानक १३ सप्टेंबरला हा प्रकल्प गुजरातला गेल्याने मोठी राजकीय वादावादी झाली.

अग्रवाल यांनी टिवटरवरून याबाबत खुलासा करताना सांगितले की, १.५२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी व्यावसायिकदृष्ट्या ठिकाणाचा अभ्यास केला गेला. मात्र, कंपनीच्या सर्व अपेक्षा या गुजरातमध्ये पूर्ण होत होत्या, असे त्यांनी सांगितले.

वैज्ञानिक व आर्थिक प्रक्रियेसाठी अनेक वर्षे खर्च केली गेली. फॉक्सकॉन ही सर्वोत्तम व्यवस्थापन सल्लागार कंपनी आहे. या कंपनीने या प्रकल्पाची जागा निवडण्यासाठी विशेष टीम बनवली. या टीमने पाच ते सहा राज्यांचे दौरे केले. प्रत्येक राज्य हा प्रकल्प होण्यासाठी पुढे सरसावला होता. आम्हाला हव्या असलेल्या प्रत्येक गोष्टी ही राज्ये देत होती. मात्र, वेळेचे बंधन असल्याने आम्ही गुजरातची निवड केली. आम्हाला मूल्यांकनात आणखी दोन महिने घालवायचे नव्हते. त्यामुळेच त्यांनी गुजरातची शिफारस केली. त्यानुसार आम्ही हे राज्य निवडले.

या प्रकल्पाला प्रचंड निधी लागणार आहे तो कसा उभारणार यावर ते म्हणाले की, हा प्रकल्प दोन टप्प्यात उभारला जाईल. पहिल्या टप्प्यात १० अब्ज डॉलर्स लागतील. जगातील कोणतीही संस्था या प्रकल्पाला अर्थपुरवठा करण्यास नकार देणार नाही. जेव्हा मी बाल्को कंपनी विकत घेतली. तेव्हा त्याची किंमत ५५० कोटी होती. तेव्हा माझ्याकडे तितके पैसे नव्हते. जेव्हा मी केर्न्स एनर्जी विकत घेतली तेव्हा माझ्याकडे १४ अब्ज डॉलर्स नव्हते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in