सोरेन यांना अटक झाल्यास पत्नी मुख्यमंत्री

सत्ताधारी पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी किंवा राजभवनातून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात कुठलीही कारवाई केली
सोरेन यांना अटक झाल्यास पत्नी मुख्यमंत्री

रांची : झारखंडमध्ये अचानक राजकीय हालचाली वाढल्या आहेत. गांडेय विधानसभा मतदारसंघातील आमदार सर्फराज अहमद यांनी राजीनामा दिला आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने सातवे समन्स बजावल्यानंतर अहमद यांनी दिलेला राजीनामा भविष्यात होणाऱ्या मोठ्या उलथापालथीचे संकेत देत आहे. सोरेन यांच्यासमोरील अडचणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे त्यांचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. कल्पना सोरेन या अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागेवरून लढू शकत नसल्याने गांडेय या खुल्या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे.

सत्ताधारी पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी किंवा राजभवनातून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात कुठलीही कारवाई केली गेली तर कल्पना सोरेन या सत्तेची जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे येऊ शकतात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासोबत कल्पना सोरेन या विधानसभेत पोहोचल्या होत्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चा पक्षामध्ये हेमंत सोरेन यांचा पर्याय म्हणून जोबा मांझी, चंपई सोरेन आणि सविता महतो यांच्या नावांचीही वेळोवेळी चर्चा होत आली आहे.

मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे नाव आघाडीवर आहे. याबाबतचा पुढील घटनाक्रम हा ईडीकडून हेमंत सोरेन यांच्या होणाऱ्या चौकशीवर आणि पुढील कारवाईवर अवलंबून असेल.

कुठलाही धोका टाळण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चाने रणनीती आखली आहे. सरफराज अहमद यांनी दिलेल्या राजीनाम्याची कुणकुण झारखंड मुक्ती मोर्चाच्या इतर आमदारांसह नेत्यांनाही लागली नव्हती. आता अहमद यांना गिरीडिह लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in