

मुंबई : ५७वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (ईफी) गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील चित्रपटकर्मी, चित्रपट रसिक आणि सर्जनशील कलाकार एकत्र येणार आहेत. यंदा या महोत्सवासाठी १३७ देशांमधून १,९०० हून अधिक चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. यंदाच्या महोत्सवात ८६ देशांतील १५० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवले जाणार आहेत.
यासोबतच या महोत्सवाच्या माध्यमातून आंतरसांस्कृतिक देवाणघेवाण, कथात्मक मांडणीतली वैविध्यपूर्णता आणि चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेसाठी एक बहुआयामी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पूर्वतयारी आणि महोत्सवाच्या रुपरेषेची झलक मांडणारी अर्थात कर्टन रेझर पत्रकार परिषद शुक्रवारी गोव्यातील ताज सिदाद दे गोवा होरायझन इथे पार पडली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीचा गौरव करणाऱ्या महोत्सवाच्या विस्तृत कार्यक्रमाचे अनावरण केले. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबतच्या गोव्याच्या नात्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला. हा महोत्सव राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि वार्षिक दिनदर्शिकेचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष लोबो, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे अध्यक्ष कृष्ण कुमार आणि महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यासोबतच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात, कथात्मक चित्रपट (फीचर) परीक्षक मंडळाचे अध्यक्ष मधुर भांडारकर आणि कथाबाह्य चित्रपट परीक्षक मंडळाचे अध्यक्ष हिमांशू शेखर खटुआ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वैश्विक भावना मांडणार
महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांनी ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’ या संकल्पनेचा अर्थ उलगडून सांगितला. भौगोलिक, भाषिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडण्याची आणि वैश्विक मानवी भावना व गोष्ट सांगण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना एकत्र आणण्याची ताकद चित्रपटांमध्ये असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.