आरोग्याची काळजी घ्या म्हणाले अन् स्टेजवरच कोसळले, शास्त्रज्ञ आणि IIT चे प्रा. समीर खांडेकर यांचा अचानक मृत्यू

आरोग्याची काळजी घ्या, असे म्हणताच ते घामाघुम झाले, प्रकृती खालावली आणि ते खाली पडले व पुन्हा उठले नाहीत.
आरोग्याची काळजी घ्या म्हणाले अन् स्टेजवरच कोसळले, शास्त्रज्ञ आणि IIT चे प्रा. समीर खांडेकर यांचा अचानक मृत्यू
Published on

कानपूर आयआयटीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. समीर खांडेकर यांचे निधन झाल्याचे वृत्त आले आहे. शुक्रवारी मंचावर बोलत असतानाच अचानक ते कोसळले. यानंतर लोकांनी धाव घेऊन त्यांना उचलून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

आरोग्याची काळजी घ्या...हे अखेरचे शब्द ठरले

माहितीनुसार, खांडेकर आयआयटी कानपूरमध्ये माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. ते आरोग्या संदर्भात भाषण करत होते, असे तेथे उपस्थित लोकांनी सांगितले. आरोग्याची काळजी घ्या...हे त्यांचे अखेरचे शब्द ठरले. आरोग्याची काळजी घ्या, असे म्हणताच ते घामाघुम झाले, प्रकृती खालावली आणि ते खाली पडले व पुन्हा उठले नाहीत.

तेथे उपस्थित लोकांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता आयआयटीच्या सभागृहात हा कार्यक्रम सुरू होता. माजी विद्यार्थी तेथे भाषणे देत होते. त्यानंतर प्रा. खांडेकरांचा क्रमांक आला. ते बोलायला स्टेजवर पोहोचले. आरोग्याची काळजी घेण्याबाबत ते भाषणात बोलत होते. त्यानंतर ही संपूर्ण घटना घडली.

आयआयटी कानपूर व्यवस्थापनाला धक्का-

खांडेकर हे कानपूरच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागात वरिष्ठ प्राध्यापक होते. यासोबतच स्टुडंट अफेयर्सचे डीन पदावरही कार्यरत होते. खांडेकर यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1971 रोजी जबलपूर येथे झाला. त्यांनी 2000 मध्ये IIT कानपूरमधून B.Tech आणि 2004 मध्ये जर्मनीमधून PhD केले. यानंतर ते 2004 मध्ये आयआयटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाले. 2009 मध्ये सहयोगी प्राध्यापक, 2014 पासून प्राध्यापक, 2020 मध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख झाले. 2023 मध्ये त्यांना स्टुडंट अफेयर्सच्या डीन पदाची जबाबदारी मिळाली. प्राध्यापकांच्या अचानक मृत्यूने संपूर्ण आयआयटी कानपूर व्यवस्थापनाला धक्का बसला आहे.

नावावर 8 पेटंट्स -

खांडेकरांच्या सहकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, 2019 मध्ये त्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवली होती. त्यांची औषधे सुरूच होती. त्यांच्या पश्चात आई-वडिलांशिवाय पत्नी प्रद्यन्या आणि केंब्रिज विद्यापीठात शिकणारा मुलगा प्रवाह खांडेकर असा परिवार आहे. मुलगा परतल्यानंतरच त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. सध्या त्यांचा मृतदेह संस्थेच्या आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला आहे. ते आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थीही होते. त्यांच्या नावावर 8 पेटंट्स (स्वतः लावलेला शोध) देखील आहेत.

logo
marathi.freepressjournal.in