IIT मद्रास सहाव्यांदा ठरली सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था, IISc सलग ९व्यांदा सर्वश्रेष्ठ विद्यापीठ

आयआयटी मद्रास ही सलग सहाव्यांदा देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था, तर बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) सलग नवव्यांदा सर्वश्रेष्ठ विद्यापीठ म्हणून निवडली गेली आहे.
IIT Madras
आयआयटी मद्रास सहाव्यांदा सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था
Published on

नवी दिल्ली : आयआयटी मद्रास ही सलग सहाव्यांदा देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था, तर बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) सलग नवव्यांदा सर्वश्रेष्ठ विद्यापीठ म्हणून निवडली गेली आहे, तर आयआयटी मुंबईला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

केंद्रीय शिक्षण खात्याने ‘राष्ट्रीय रँकिंग इन्स्टिट्यूट फ्रेमवर्क २०२४’ जाहीर केले. यात देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्थांची यादी जाहीर केली जाते.

देशातील सर्वोच्च दहा शैक्षणिक संस्थांमध्ये आठ आयआयटी, तर दिल्लीतील ‘एम्स’ व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आदींचा समावेश आहे.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बहुप्रतीक्षित ‘राष्ट्रीय रँकिंग फ्रेमवर्क’ संस्थेच्या रँकिंगची घोषणा केली. नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित कार्यक्रमात १३ श्रेणींचे रँकिंग जाहीर करण्यात आले.

‘एनआयआरएफ’मध्ये विविध मानके लावून भारतातील उच्चशिक्षण संस्थांचे मूल्यांकन व रँकिंग जाहीर करण्यात येते. आयआयटी मद्रास, पहिल्या क्रमांकावर तर भारतीय विज्ञान संस्थान (आयआयएससी) बंगळुरूने दुसरा क्रमांक मिळवला.

अभियांत्रिकी क्षेत्रातील नामवंत शिक्षण संस्थांमध्ये आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयटी कानपूर, आयआयटी खरगपूर, आयआयटी रूरकी, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी हैदराबाद, एनआयटी तिरुचिरापल्ली, आयआयटी-बीएचयू वाराणसी आदींचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट विद्यापीठात भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) बंगळुरू, जेएनयू (नवी दिल्ली), जेएमआय (नवी दिल्ली), मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन (मणिपाल), बीएचयू (वाराणसी), दिल्ली विद्यापीठ, अमृता विश्व विद्यापीठम (कोइम्बतूर), एएमयू (अलीगड), जादवपूर विश्वविद्यालय (कोलकाता), व्हीआयटी (वेल्लोर) आदींचा समावेश आहे.

भारतातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयात हिंदू कॉलेज (दिल्ली), मिरांडा हाऊस (दिल्ली), सेंट स्टीफन्स कॉलेज (दिल्ली), रामकृष्ण मिशन विवेकानंद शताब्दी कॉलेज (कोलकाता), आत्मा राम सनातन धर्म कॉलेज (दिल्ली), सेंट झेवियर्स कॉलेज (कोलकाता), एसजीआर कृष्णम्मल महिला कॉलेज (कोइम्बतूर), लोयोला कॉलेज (चेन्नई), किरोडीमल कॉलेज (दिल्ली), लेडी श्री राम कॉलेज फॉर विमेन (दिल्ली) आदींचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट कायदा शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया विद्यापीठ (बंगळुरू), राष्ट्रीय विधि विश्वविद्यालय (दिल्ली), नालसार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ (हैदराबाद), पश्चिम बंगाल राष्ट्रीय विधि विज्ञान विश्वविद्यालय (कोलकाता), सिम्बायोसिस लॉ स्कूल (पुणे) आदींचा समावेश आहे.

आर्किटेक्चर व नियोजन श्रेणीत आयआयटी रूरकी, आयआयटी खरगपूर, एनआयटी कालिकत, आयआयईईएसटी (शिबपूर), स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲॅण्ड आर्किटेक्चर (नवी दिल्ली) आदींचा समावेश आहे.

वैद्यकीय श्रेणीत ‘एम्स’ दिल्ली प्रथम स्थानी

वैद्यकीय श्रेणीत ‘एम्स’ दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे, तर महाविद्यालय श्रेणीत ‘हिंदू कॉलेज’ने पहिला क्रमांक मिळवला. व्यवस्थापन अभ्यासक्रमात आयआयएम अहमदाबादने पहिला क्रमांक मिळवला. त्यानंतर आयआयएम बंगळुरू, आयआयएम कोझिकोड, आयआयएम कोलकाता, आयआयएम मुंबई, आयआयएम लखनऊ, आयआयएम इंदौर आदींचा क्रमांक आहे.

logo
marathi.freepressjournal.in