
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच पॉडकास्टसारख्या माध्यमातून सर्वांसमोर येणार आहेत. 'झिरोधा' या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या ‘पीपल बाय डब्ल्यूटीएफ’ पॉडकास्ट मालिकेतील पुढचे पाहुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. या पॉडकास्टच्या नव्या ट्रेलरमधून याचा खुलासा झाला आहे. कामथ यांच्या पॉडकास्टच्या या भागाचे नाव ‘पीपल विथ द प्राइम मिनिस्टर’ असे आहे.
यापूर्वी गुरुवारी निखिल कामथ यांनी एक टीझर प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये निखिल कामथ पॉडकास्टवर आलेल्या एका पाहुण्याबरोबर बोलत असल्याचे दाखवले होते. मात्र, त्यामध्ये पाहुणे कोण आहे, हे दाखवले नव्हते. असे असले तरी टीझरमधील आवाजावरून हे पाहुणे नरेंद्र मोदी असल्याचा अंदाज अनेकांनी लावला होता. आता शुक्रवारी निखिल कामत यांनी पॉडकास्टवरील पुढील पाहुणे मोदी असल्याचा खुलासा करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
या पॉडकास्टमध्ये सुरुवातीलाच “मी पहिल्यांदाच पॉडकास्टमध्ये सहभागी होत आहे,” असे पंतप्रधानांनी म्हटल्याचे ऐकू येत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात दिलेल्या भाषणाचाही उल्लेख केला, चुका अपरिहार्य आहेत. मीही चुका केल्या असतील. मी एक माणूस आहे, देव नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पॉडकास्टच्या या ट्रेलरमध्ये, मोदी जागतिक तणाव आणि सध्या चालू असलेल्या जगातील युद्धांबाबत भारताच्या भूमिकेवर भाष्य करतानाही दिसत आहेत. ते म्हणाले, या संकट काळात आम्ही सातत्याने सांगत आहोत की, आम्ही तटस्थ नाही. आम्ही शांततेच्या बाजूचे आहोत.
चांगल्या लोकांनी राजकारणात यावे!
पॉडकास्टच्या ट्रेलरमध्ये मोदी यांनी लोकांना राजकारणात येण्याचे आवाहन केल्याचेही दिसत आहे. राजकारणात येण्याची इच्छा असणाऱ्यांना त्यांनी एक सल्लाही दिला. ते म्हणाले, लोकांनी महत्त्वाकांक्षा घेऊन नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे. चांगल्या लोकांनी राजकारणात येत राहिले पाहिजे.
कोण आहेत निखिल कामथ?
निखिल कामथ हे ब्रोकिंग फर्म ‘झिरोधा’ तसेच ‘टू बीकन’ या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. याशिवाय ते रिटेल स्टॉक ब्रोकरही आहेत. कर्नाटकातील शिमोगा येथे जन्मलेल्या निखिल कामथ यांचे शिक्षण फक्त दहावीपर्यंतच झाले आहे. कंपनी सुरू करण्यापूर्वी निखिल कामथ एका कॉलसेंटरमध्ये काम करायचे. पुढे २०१० मध्ये निखिल कामथ यांनी त्यांचे भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत ‘झिरोधा’ कंपनी सुरू केली.