वेग १०२ किमी प्रतितास! ‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी बंगाल, बांगलादेशला धडकणार; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस होणार

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याची तीव्रता वाढत आहे. यातून ‘रेमल’ चक्रीवादळ तयार झाले आहे. ते २६ मे रोजी प. बंगाल व बांगलादेशला धडकणार आहे...
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र Pixabay

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याची तीव्रता वाढत आहे. यातून ‘रेमल’ चक्रीवादळ तयार झाले असून ते २६ मे रोजी प. बंगाल व बांगलादेशला धडकणार आहे, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे पहिलेच वादळ असून त्याचे नामकरण ‘रेमल’ केले आहे.

रविवारी चक्रीवादळाचा वेग १०२ किमी प्रतितास

भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ मोनिका शर्मा म्हणाल्या की, शुक्रवार सकाळपासून या चक्रीवादळावर लक्ष ठेवायला सुरुवात करेल. शनिवारी सकाळपासून या वादळाची तीव्रता वाढणार असून रविवारी सायंकाळी ते बांगलादेश व प. बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. रविवारी या चक्रीवादळाचा वेग १०२ किमी प्रतितास असेल. या वादळामुळे प. बंगाल, उत्तर ओदिशा, मिझोराम, त्रिपुरा व दक्षिण मणिपूर येथे २६ व २७ मे रोजी मुसळधार पाऊस होणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

वातावरण बदलामुळे चक्रीवादळांची संख्या वाढली

वातावरण बदलामुळे समुद्राचे तापमान वाढत असल्याने चक्रीवादळ होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. १८८० पासून समुद्राच्या तापमानाची नोंद ठेवण्यास सुरुवात झाली. गेल्या ३० वर्षांपासून समुद्राचे तापमान वाढू लागले आहे.

हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डी. एस. पै म्हणाले की, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत असल्याने हवेत आर्द्रता वाढत आहे. या परिस्थितीमुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची प्रमाण वाढले आहे.

पृष्ठभागावरील तापमानवाढीचा परिणाम

केंद्रीय पृथ्वी विज्ञान विभागाचे माजी सचिव माधवन राजीवन यांनी सांगितले की, समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २७ अंश असते. त्यापेक्षा ते अधिक झाल्यास कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यातून चक्रीवादळाची निर्मिती होते. सध्या बंगालच्या उपसागराच्या पृष्ठभागावरील तापमान ३० अंश सेल्सियसवर गेले आहे. बंगालचा उपसागर व अरबी समुद्राचे तापमान वाढत असल्याने चक्रीवादळ सहजपणे निर्माण होऊ शकतात, असे ते म्हणाले.

महासागरामुळे विषुववृत्तीय चक्रीवादळ निर्माण होत नाहीत. त्यात वातावरणही महत्त्वाची भूमिका बजावत असते. वारे उभ्या दिशेने वाहू लागल्यास चक्रीवादळाची तीव्रता वाढते. या चक्रीवादळाचा मान्सूनच्या प्रगतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे हवामान मॉडेल्सने सुचवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in