नवी दिल्ली : राज्यसभेत शुक्रवारी सभापती जगदीप धनखड व खासदार जया बच्चन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. सभापती धनखड यांनी माझ्याविरोधात गैरवर्तन केल्याचा आरोप करून खासदार जया बच्चन यांनी त्यांच्याकडे माफीची मागणी केली. त्यामुळे आता विरोधकांनी सभापती धनखड यांच्याविरोधात महाभियोगाची तयारी चालवल्याची जोरदार चर्चा आहे.
धनखड यांच्याविरोधात ‘कलम ६७’नुसार महाभियोग प्रस्ताव सादर करण्याचा विचार विरोधक करत आहेत.
राज्यसभेत सपाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती धनखड यांच्या भाषेच्या ‘टोन’वर आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सभापतींनी विरोधकांना सभागृहाची शिस्त पाळण्याचे आवाहन केले.
मी कलाकार आहे, देहबोली मला समजते - बच्चन
मी कलाकार आहे. मला देहबोली समजते. चेहऱ्यावरील हावभावातून काय म्हणायचे आहे हे मला कळते. सर, तुम्ही मला माफ करा. पण, तुमच्या बोलण्यातील ‘टोन’ मला मान्य नाही. तुम्ही भलेही सभापतीच्या खुर्चीत बसलेले आहात. पण, आम्ही तुमचे सहकारीच आहोत, असे जया बच्चन म्हणाल्या.
तुम्ही सेलिब्रिटी असाल, पण सभागृहाची प्रतिष्ठा राखावी लागेल
त्यावर सभापती धनखड म्हणाले की, ‘जयाजी तुम्ही तुमच्या जागेवर बसा. अभिनेता हा दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार काम करतो. मी या जागेवर बसून ज्या बाबी पाहिल्या त्या तुम्ही पाहिल्या नाहीत. तुम्ही माझ्या भाषेच्या ‘टोन’वरून बोलत आहात. पण, आता खूप झाले. तुम्ही सेलिब्रेटी असाल, पण तुम्हाला सभागृहाची प्रतिष्ठा राखावीच लागेल, असे धनखड यांनी बच्चन यांना सुनावले.