
नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखरकुमार यादव यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी विरोधी पक्षांच्या विविध सदस्यांनी शुक्रवारी राज्यसभा सरचिटणीसांकडे नोटीस दिली.
या नोटिशीवर विरोधी पक्षांच्या ५५ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामध्ये कपिल सिब्बल, दिग्विजयसिंह, विवेक तन्खा, मनोजकुमार झा आणि साकेत गोखले आदींचा समावेश आहे. या खासदारांनी राज्यसभेच्या सरचिटणीसांची भेट घेऊन त्यांच्याकडे महाभियोगाबाबतची नोटीस सुपूर्द केली. सर्वोच्च न्यायालयाने न्या. शेखरकुमार यादव यांच्या वक्तव्याची दखल घेत त्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून त्याबाबतचा अहवाल मागविला आहे.