इम्रान खान यांना ५ वर्षे निवडणूक बंदी

पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित माहिती लपवल्याचा आणि तोषखान्यातील काही वस्तू विकल्याचा आरोप होता.
इम्रान खान यांना ५ वर्षे निवडणूक बंदी
Published on

तोषखाना प्रकरणात अपात्र ठरवून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ५ वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याचा निर्णय पाकच्या निवडणूक आयोगाने घेतला आहे. तसेच त्यांचे संसदेचे सदस्यत्वही रद्द केले आहे. तोषखानाप्रकरणी आलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. इम्रान यांच्यावर पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तूंशी संबंधित माहिती लपवल्याचा आणि तोषखान्यातील काही वस्तू विकल्याचा आरोप होता. इम्रानच्या विरोधात निकाल दिल्यानंतर इम्रानच्या समर्थकांनी पाकिस्तान निवडणूक आयोगाच्याकार्यालयाबाहेर निदर्शने केली. या लोकांना हटवण्यासाठी सुरक्षारक्षक आले असता समर्थकांनी गोळीबार केला. नंतर त्यांना हटवण्यात आले.

पाकिस्तानचे मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान रझा यांच्या अध्यक्षतेखालील ४ सदस्यीय खंडपीठाने इम्रानच्या विरोधात हा निकाल दिला. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात विरोधी पक्षांच्या खासदारांनी या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तोषखान्यात जमा केलेल्या भेटवस्तू स्वस्तात विकत घेऊन चढ्या भावात विकल्याचा आरोप इम्रान यांच्यावर होता.

logo
marathi.freepressjournal.in