
नवी दिल्ली : पुढील वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमारच मोठा भाऊ असणार आहेत, असा खुलासा भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी रविवारी केला. अन्य राज्यात कमी जागा असणाऱ्या पक्षांना न विचारणारा भाजप बिहारमध्ये कमी जागा असलेल्या जदयूला मोठ्या भावाचा मान देत असल्याने राजकीय वर्तुळात याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बिहारमध्ये २०२५ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवावी याबाबत भाजपमध्ये कोणताही भ्रम नाही. ही निवडणूक विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.
ते म्हणाले की, बिहारमध्ये रालोआ आघाडी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल. २०२० ची निवडणूकही नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढवली गेली होती. त्यामुळे यंदाही त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
लालूप्रसादांवर हल्लाबोल
लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांवर हल्लाबोल करताना चौधरी म्हणाले की, लालूप्रसाद यादव यांनी आपल्या १५ वर्षांच्या सत्तेचा हिशोब दिला पाहिजे. ‘बीपीएससी’च्या परीक्षेचे पेपर फुटलेले नाहीत. तांत्रिक कारणामुळे परीक्षा रद्द झाली आहे. कोणी पेपरफुटीचे पुरावे दिल्यास सरकार परीक्षा रद्द करेल, असे आव्हान त्यांनी दिले.
यापूर्वीही बिहार भाजप अध्यक्ष डॉ. दिलीप जायस्वाल यांनी बिहार विधानसभा निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, अशी घोषणा केली होती. दरम्यान, १५ जानेवारीला सर्व जिल्ह्यांत रालोआच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचे संमेलन होणार आहे.