दिल्लीसह गुजरात, गोवा, हरयाणात काँग्रेस-आपचे गळ्यात गळे

जागावाटपाच्या समझोत्यानुसार आप दिल्लीत चार जागा लढणार आहे, तर काँग्रेस तीन जागा लढणार आहे.
दिल्लीसह गुजरात, गोवा, हरयाणात काँग्रेस-आपचे गळ्यात गळे

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि आप या पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या मतैक्यानुसार शनिवारी दिल्लीसह गुजरात, गोवा आणि हरयाणातील जागावाटप जाहीर करण्यात आले आहे.

जागावाटपाच्या समझोत्यानुसार आप दिल्लीत चार जागा लढणार आहे, तर काँग्रेस तीन जागा लढणार आहे. काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक आणि आपचे सरचिटणीस (संघटना) संदीप पाठक यांनी शनिवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर केले.

पक्षाचे राजकीय हित बाजूला ठेवून आम्ही काँग्रेसशी आघाडी केली आहे. पक्षासाठी देश महत्त्वाचा असून पक्ष दुय्यम स्थानी आहे, असे पाठक यांनी सांगितले.

जागावाटप सूत्रानुसार आप नवी दिल्ली, दिल्ली-पश्चिम, दिल्ली-दक्षिण आणि दिल्ली-पूर्व या जागा लढणार आहे, तर काँग्रेस चांदनी चौक, दिल्ली-ईशान्य आणि दिल्ली-वायव्य या जागा लढणार आहे, असे मुकुल वासनिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपने २०१४ आणि २०१९च्या निवडणुकीत या सातही जागा जिंकल्या होत्या. गेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला प्रत्येक जागेवर काँग्रेस-आपच्या एकूण मतांपेक्षा अधिक मते मिळाली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी काँग्रेस-आप आघाडी संधीसाधू असल्याची टीका केली आहे.

गुजरातमध्ये आप २६ पैकी भडोच आणि भावनगर या जागा लढणार असून उर्वरित २४ जागा काँग्रेस लढणार आहे. काँग्रेस गोव्यातील दोन्ही जागा लढणार असून चंदिगडमधील एकमेव जागाही लढणार आहे. हरयाणातील १० जागांपैकी काँग्रेस नऊ जागा लढणार असून कुरुक्षेत्र ही जागा आप लढणार आहे. पंजाबमधील विशिष्ट स्थितीमुळे दोन्ही पक्ष एकमेकांच्या सहमतीने स्वबळावर लढणार आहेत, असे वासनिक म्हणाले. पंजाबबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत आपचे नेते पाठक म्हणाले की, जनता सूज्ञ आहे, त्यांना सर्व गोष्टींची चांगलीच जाण आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in