रांची : दसम पोलीस स्टेशन परिसरात राष्ट्रीय महामार्ग-३३ वर कोलकाता-रांची या लांब पल्ल्याच्या बसमध्ये चौघा दरोडेखोरांनी तीन व्यावसायिकांना बंदुकीच्या धाकावर लुटले. त्यांच्याकडून त्यांनी १८ लाख रुपयांची रोकड लुटली असल्याचे रांची जिल्ह्यातील दसम पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रेम प्रताप यांनी सांगितले.
सोमवारी रात्री त्यांच्या व्यवसायाशी संबंधित पैसे गोळा केल्यानंतर तिघे व्यापारी कोलकाता येथे बसमध्ये चढले. चार गुन्हेगारही प्रवासी म्हणून त्याच बसमध्ये चढले होते. बस पहाटे साडेपाचच्या सुमारास बुंडूला पोहोचली तेव्हा चार गुन्हेगारांनी बंदुकीच्या जोरावर व्यावसायिकांना लुटले. त्यानंतर, ते नवादीहमध्ये बसमधून खाली उतरले. त्यांच्याकडून सुमारे १८ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आल्याचा दावा व्यावसायिकांनी केला आहे. या लुटीमागे असलेल्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.