'ते' रात्री एकटीला बोलावतात...सततच्या लैंगिक छळामुळे महिला न्यायाधीशाची सरन्यायाधीशांकडे इच्छामृत्यूची विनंती

“मी सामान्य जनतेला न्याय मिळवून देईन या विश्वासाने आणि मोठ्या उत्साहाने न्यायिक सेवेत रुजू झाले. पण,...
'ते' रात्री एकटीला बोलावतात...सततच्या लैंगिक छळामुळे महिला न्यायाधीशाची सरन्यायाधीशांकडे इच्छामृत्यूची विनंती

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील एका महिला न्यायाधीशाने थेट सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना पत्र लिहून खळबळ उडवून दिली आहे. वरिष्ठ जिल्हा न्यायाधीशांवर गंभीर आरोप करीत, सततच्या शारीरिक व मानसिक छळाला आपण आता कंटाळलो आहोत, त्यामुळे इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी आपल्या दोनपानी पत्रात केली आहे. हे पत्र सोशल मीडियावरही व्हायरल झाले असून आता सरन्यायाधीशांनी दखल घेतली आहे. सरन्यायाधीशांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून या प्रकरणी स्टेटस रिपोर्ट मागवला आहे.

"कृपया मला माझे जीवन सन्मानपूर्वक संपवण्याची परवानगी द्या," अशा मथळ्याचे हे पत्र बांदा जिल्ह्यातील दिवाणी न्यायाधीश अर्पिता साहू यांनी लिहिले आहे. जिल्हा न्यायाधीश आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून लैंगिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे.

“मी सामान्य जनतेला न्याय मिळवून देईन या विश्वासाने आणि मोठ्या उत्साहाने न्यायिक सेवेत रुजू झाले. पण, मलाच प्रत्येक दारात न्यायासाठी भिकारी बनावे लागेल हे माहित नव्हते. माझ्या सेवेच्या अल्पावधीत मला खुल्या कोर्टात व्यासपीठावर शिवीगाळ होण्याचा दुर्मिळ सन्मान मिळाला आहे. भारतात काम करणाऱ्या महिलांनी लैंगिक छळ सहन करुन जगायला शिकावे, कारण हेच आपले जीवन आहे.”

“न्यायाधीश मला रात्री एकटीला भेटायला बोलावतात. माझा अनेकदा लैंगिक छळ झाला आहे. मला पूर्णपणे कचऱ्यासारखे वागवले गेले, ” असेही त्यांनी पत्रात लिहिले, जे गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. महिला न्यायाधीशांचे म्हणणे आहे की, त्यांनी याबाबत अनेकदा तक्रार केली होती, परंतु आजपर्यंत तिच्या तक्रारीवर कोणतीही सुनावणी झाली नाही. यामुळे निराश होऊन त्यांनी सरन्यायाधीशांना पत्र पाठवले आहे.  

दरम्यान, या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 13 डिसेंबर रोजी महिला न्यायाधीशाची याचिका फेटाळली होती. अंतर्गत समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे, त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. पण आता सरन्यायाधिशांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून या प्रकरणी स्टेटस रिपोर्ट मागवला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in