पुष्पक एक्सप्रेसमध्ये महिलांची सुरक्षा धोक्यात आल्याचं दिसून आलं आहे. या एक्सप्रेसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या बोगीतून पुरुषांचा वावर वाढला आहे. एका महिला प्रवाशाने लोहमार्ग पोलीस प्रशासनाकडे याबाबत तक्रार करत संताप व्यक्त केला आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर कल्याण रेल्वे स्थानकातील आरपीएफ पथकाने महिला बोगीतील पाच पुरुष प्रवाशांवर कारवाई करुन त्यांना कटक केली आहे.
लखनऊहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्प्रेसमध्ये २२ जून रोजी महिलां प्रवाशांच्या बोगीत पुरुष प्रवास करत होते. सोनाली गुजराथी नामक महिला त्याच बोगीतून प्रवास करत होती. त्यावेळी बोगीत बसलेल्या पुरुष प्रवाशांना महिला प्रवाशांनी बसण्यासाठी जागा देण्याची विनंती केली. यावेळी पुरुष प्रवाशांनी मात्र स्त्रीयांशी अरेरावी केली. तसंच ते जनरल बोगीत बसायला गेले नाहीत. त्या महिलांना हा घडलेला प्रकार लोहमार्ग पोलिसांच्या सोशल मीडिया गृपवर टाकला. या व्हिडिओत महिला बोगीत पुरुष फेरीवाल्यांचा देखील वावर असल्याचं दिसून येत आहे.
महिलांनी अपलोड केलेला व्हिडीओ रेल्वेच्या सोशल मीडिया गृपवर व्हायरल झाला होता. यानंतर आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कल्याण स्टेशनवर धाव घेतली. यावेळी महिलांच्या बोगीत बसलेल्या पुरुष प्रवाशांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली गेली. यावेळी आरपीएफला बघून काहींनी पळ काढला. महिलांच्या बोगीत सुरक्षा वाढवण्याची मागणी महिलांकडून करण्यात आली.