उद्या मतदान! देशभरात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमधून सलग तिसऱ्यांदा रिंगणात असून दुसरे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे अरुणाचल प्रदेशमधून निवडणूक लढवत आहेत. माजी मुख्यमंत्री नबम तुकी हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत.
उद्या मतदान! देशभरात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात १०२ जागांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या

नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांवर १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून बुधवारी या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पहिल्या टप्प्यात आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि एक माजी राज्यपाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमधून सलग तिसऱ्यांदा रिंगणात असून दुसरे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे अरुणाचल प्रदेशमधून निवडणूक लढवत आहेत. माजी मुख्यमंत्री नबम तुकी हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. सर्वानंद सोनोवाल हे पुन्हा लोकसभेत जाण्याच्या तयारीत असून ते आसामच्या दिब्रूगड मतदारसंघातून रिंगणात आहेत.

मुझफ्फरनगरमध्ये केंद्रीय मंत्री संजीव बालियन हे रिंगणात असून तेथे सपा आणि बसपाच्या उमेदवारांसमवेत त्यांची लढत होणार आहे. तर उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे सलग तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. राजस्थानच्या अलवारमधून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव तर बिकानेरमधून केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे रिंगणात आहेत.

तामिळनाडूतील नीलगिरी मतदारसंघातून विद्यमान खासदार ए. राजा यांची लढत केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्याशी होणार आहे. शिवगंगाचे खासदार कार्ती चिदम्बरम यांची लढत भाजप आणि अद्रमुकच्या उमेदवारांशी होणार आहे. तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई हे कोइम्बतूर मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांची लढत द्रमुक आणि अद्रमुकच्या उमेदवारांशी होणार आहे.

तेलंगणच्या माजी राज्यपाल तामिळीसाई सुंदरराजन या चेन्नई दक्षिण मतदारसंघातून रिंगणात आहेत, गेल्या निवडणुकीत त्या थुथूकुडी मतदारसंघातून द्रमुकच्या कनिमोळी यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभूत झाल्या होत्या. कनिमोळी यावेळीही रिंगणात आहेत. छिंदवाडा येथून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ रिंगणात आहेत. त्रिपुरामधून माजी मुख्यमंत्री विप्लवकुमार देव आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आशिषकुमार साहा यांच्यात लढत होणार आहे. आसाममध्ये काँग्रेसचे गौरव गोगोई यावेळी जोरहाट मतदारसंघातून रिंगणात आहेत, तेथे त्यांची लढत भाजपचे तपनकुमार गोगोई यांच्याशी होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in