
जयपूर : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना अखेर भाजपने उमेदवारी दिली आहे. शनिवारी भाजपने जाहीर केलेल्या ८३ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत वसुंधराराजे यांना स्थान देण्यात आले आहे. इकडे काँग्रेसनेदेखील आपल्या ३३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट यांचा समावेश आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या यादीत पाच विद्यमान मंत्र्यांनाही स्थान मिळाले आहे.
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी भांडण झाल्यानंतर राजस्थान भाजपमध्ये वादळ उठले होते. वसुंधराराजे यांना विधानसभेची उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यातच भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने वसुंधराराजे यांच्या समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. परंतु, कोणताही धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नसलेल्या भाजपने अखेर वसुंधराराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनाही उमेदवारी देत त्यांची नाराजी दूर केली आहे.
शुक्रवारी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीत भाजपच्या ८३ उमेदवारांची दुसरी यादीत निश्चित करण्यात आली. यात अनुसूचित जातीच्या १५, अनुसूचित जमातीच्या १०, तर १० महिलांना तिकीट देण्यात आले आहे. राजस्थानमध्ये वसुंधराराजे सिंधिया यांची कमालीची लोकप्रियता आहे. त्यामुळे त्यांना डावलणे भाजपला परवडणारे नाही, ही बाब या बैठकीत चर्चिली गेली. वसुंधराराजे या गेली अनेक वर्षे भाजपसोबत आहेत. त्यांच्या आई विजयाराजे सिंधिया भारतीय जनसंघ आणि नंतर भाजपच्या प्रमुख नेत्या होत्या. त्यामुळे त्यांना डावलणे भाजपला शक्य झाले नाही.
काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सरदारपुरा येथून उमेदवारी दिली आहे, तर टोंक विधानसभा मतदारसंघातून सचिन पायलट यांना पक्षाने तिकीट दिले आहे. काँग्रेसच्या यादीत पाच विद्यमान मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत चार अनुसूचित जाती, चार अनुसूचित जमाती आणि ९ जाट नेत्यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने दोन आमदारांची तिकिटे कापली आहेत. यामध्ये चित्तोडमधून चंद्रभान सिंह आणि सांगानेरमधून अशोक लाहौती यांना उमेदवारी दिलेली नाही.