‘यूपीएससी’ परीक्षेत आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम; अनिमेष प्रधान दुसरा, डोनुरू रेड्डी तिसरी

यंदा २८०० जणांची मुलाखत झाली. त्यातील १०१६ जण उत्तीर्ण झाले. या उमेदवारांचे नाव, रोल क्रमांक त्यांच्या श्रेणीनुसार जारी केले आहेत...
‘यूपीएससी’ परीक्षेत आदित्य श्रीवास्तव देशात प्रथम; अनिमेष प्रधान दुसरा, डोनुरू रेड्डी तिसरी
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव प्रथम आला असून, अनिमेष प्रधान व डोनुरू रेड्डी यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला.

या परीक्षेत १०१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेतील १८० उमेदवार ‘आयएएस’, २०० जण ‘आयपीएस’, तर ३७ जणांची ‘आयएफएस’साठी निवड झाली, तर ६१३ उमेदवारांची निवड केंद्र सरकारच्या ‘ए’ श्रेणीतील, तर ११३ जणांची निवड ‘ब’ श्रेणीतील पदांसाठी झाली.

यंदा २८०० जणांची मुलाखत झाली. त्यातील १०१६ जण उत्तीर्ण झाले. या उमेदवारांचे नाव, रोल क्रमांक त्यांच्या श्रेणीनुसार जारी केले आहेत. ‘यूपीएससी’ने आयएएस, आयपीएस व आयएफएस व अन्य केंद्रीय सेवेतील ‘अ’ व ‘ब’ श्रेणीतील ११०५ पदांसाठी परीक्षा घेतली होती.

महाराष्ट्रातील ७० उमेदवार उत्तीर्ण

यूपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्राचा झेंडा मोठ्या डौलाने फडकला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० जण उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्या १०० जणांच्या यादीत अनिकेत हिरडे याला ८१ वी रँक मिळाली आहे. तर अर्चित डोंगरेला १५२ रँक मिळाली आहे.

पहिल्या पाचातील तिघेजण आयपीएस अधिकारी

यंदा यूपीएससी परीक्षेतील पहिल्या पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे आयपीएस अधिकारी आहेत. पहिल्या क्रमांकाचा आदित्य श्रीवास्तव, ४ था क्रमांक मिळालेला सिद्धार्थ रामकुमार व ५ वा क्रमांक मिळवलेली रुहानी हे राष्ट्रीय पोलीस अकादमीत सध्या आयपीएसची ट्रेनिंग घेत आहेत.

स्वप्नं खरी होतात - श्रीवास्तव

‘यूपीएससी’चा निकाल लागल्यावर सोशल मीडियावर पहिला क्रमांक मिळवलेल्या आदित्य श्रीवास्तवने सांगितले की, स्वप्नं खरी होतात. ‘यूपीएससी’चा प्रवास मी आयुष्यभर कायम ठेवेन. ज्या लोकांनी मला साथ दिली त्यांचा मी कायमच आभारी राहीन.

जामिया मिलियाच्या ३१ विद्यार्थ्यांची निवड

दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील ३१ उमेदवारांची ‘यूपीएससी’ परीक्षेत निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कोचिंग ॲकॅडमीतून प्रशिक्षण घेतले होते.

logo
marathi.freepressjournal.in