
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार, ६ जून रोजी सकाळी १०.३० वाजता नवी दिल्ली मधील विज्ञान भवन येथे अर्थ मंत्रालय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या आठवडाभराच्या भव्य सोहोळ्याचे उद्घाटन करतील. ६ ते ११ जून हा आठवडा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा भाग आहे.
पंतप्रधान यावेळी ‘जन समर्थ पोर्टल’ या सरकारी योजनेच्या पोर्टलचे उद्घाटन करतील. या एकाच डिजिटल पोर्टलवर सरकारच्या सर्व अनुदान-आधारित योजना उपलब्ध होतील. या पोर्टलवर त्याच्याशी जोडलेल्या सर्व योजनांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल. या दोन्ही मंत्रालयांच्या गेल्या आठ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या डिजिटल प्रदर्शनाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी १ रुपये, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांची नाणी जारी करण्यात येतील. या वैशिष्ट्यपूर्ण नाण्यांवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेचा लोगो असेल तसेच ही नाणी दृष्टीहीन व्यक्तींनादेखील सहज ओळखता येतील. हा कार्यक्रम देशात ७५ ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाणार असून प्रत्येक ठिकाण दृकश्राव्य माध्यमातून कार्यक्रमाच्या प्रमुख जागेशी जोडले जाणार आहे.