अयोध्येत लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अयोध्येत लता मंगेशकर चौक उभारला
अयोध्येत लता मंगेशकर चौकाचे लोकार्पण
Published on

“लताजी माँ सरस्वतीच्या एक साधक होत्या, ज्यांनी आपल्या दैवी वाणीने संपूर्ण जगाला मोहित केले. लताजींनी साधना केली, आम्हा सर्वांना वरदान मिळाले. त्यांनी गायलेले मंत्र श्रद्धा, अध्यात्म आणि शुद्धतेचे प्रतीक आहेत. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात स्थापित केलेली माँ सरस्वतीची विशाल वीणा, संगीताच्या अभ्यासाचे प्रतीक बनेल,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अयोध्येत लता मंगेशकर चौक उभारला आहे. त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मोदी बोलत होते.

वैशिष्ट्य : रामनगरीच्या नयाघाट येथे लता मंगेशकर चौकात सुमारे सात कोटी ९० लाख रुपये खर्चून ४० फूट लांब आणि सुमारे १४ टन वजनाची भव्य वीणा स्थापित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी बुधवारी या लता मंगेशकर चौकाचे उद्घाटन केले. यावेळी लतादीदींचे पुतणे आदिनाथ हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांची पत्नी कृष्णा मंगेशकर उपस्थित होते. “चौक संकुलातील तलावाच्या वाहत्या पाण्यात संगमरवरी ९२ पांढरी कमळे लताजींच्या संपूर्ण आयुष्याचे प्रतिबिंब ठरतील,” असेही मोदी पुढे म्हणाले. 

“दीदी मला नेहमी सांगायच्या, माणूस वयाने ओळखला जात नाही, तर कर्तृत्वाने ओळखला जातो आणि तो देशासाठी जेवढं जास्त कार्य करतो, तेवढा तो मोठा असतो,” असे सांगत नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या जयंतीदिनी भावनिक आठवणींना उजाळा दिला. मोदी पुढे म्हणाले, “मला विश्वास आहे की, अयोध्येतील लता मंगेशकर चौक आणि त्यांच्याशी निगडित अशा सर्व आठवणी आपल्याला देशाप्रति कर्तव्याची भावना निर्माण करण्यास सक्षम करतील.”

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधानांना लतादीदींचा फोन आला होता, त्या वेळेची आठवण करून देताना पंतप्रधानांनी सांगितले की, “मंदिर निर्माणाचे कार्य सुरू झाल्याने लतादीदींनी आनंद व्यक्त केला होता.” पंतप्रधानांनी लतादीदींनी गायलेल्या ‘मन की अयोध्या तब तक सूनी, जब तक राम ना आये’ या भजनाचे स्मरण केले आणि अयोध्येच्या भव्य मंदिरात भगवान श्रीरामाच्या लवकरच होणाऱ्या आगमनावर भाष्य केले.

शरयूतीरी चौक 

लता मंगेशकर चौकाच्या विकासाचे ठिकाण अयोध्येतील विविध सांस्कृतिक महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणाऱ्या प्रमुख स्थळांपैकी एक असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. हा चौक राम की पौडीजवळ आहे आणि शरयू नदीच्या पवित्र प्रवाहाजवळ आहे. “लतादीदींच्या नावावर चौक बांधण्यासाठी त्यापेक्षा आणखी कोणती चांगली जागा असू शकते?”, असे उद‌्गार पंतप्रधानांनी काढले.

logo
marathi.freepressjournal.in