नवी दिल्ली : देशात कोट्याधीशांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. वार्षिक एक कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई असलेल्या व्यक्तींची संख्या ३१ डिसेंबर २०२३ रोजी वाढून २.१६ लाख झाली असल्याची माहिती सरकारने मंगळवारी लोकसभेत जाहीर केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी प्रत्येक असेसमेंट वर्षातील एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींचा आयकर परतावा अर्जातील माहिती जाहीर केली. २०१९-१० साली कोट्याधीशांची संख्या १.०९ लाख होती जी २०२२-२३ साली १.८७ लाख झाली. तसेच ३१ डिसेंबर २०२३ रोजी ही संख्या २.१६ लाखांवर पोहोचली. चौधरी पुढे म्हणाले की, २०२३-२४ साली उत्पन्न स्त्रोत व्यावसायिक म्हणून जाहीर केलेल्यांची संख्या १२२१८ झाली आहे, जी आधीच्या २०२२-२३ साली १०५२८ होती. तसेच २०१९-२० साली ही संख्या केवळ ६५५५ होती. एका वेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, २०२३-२४ आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करसंकलन म्हणजे वैयक्तिक आयकरातून मिळालेले उत्पन्न सालागणिक २७.६ टक्क्यांनी वाढले आहे.