नवीन वर्षात टीव्ही पाहणे महाग

वायकॉम १८ आणि नेटवर्क १८ कंपनीने आपल्या चॅनलच्या दरात २० ते २५ टक्के वाढ
नवीन वर्षात टीव्ही पाहणे महाग
Published on

नवी दिल्ली : जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली असतानाच आता मनोरंजन क्षेत्रातही महागाईचा फटका सर्वांना बसणार आहे. झी एंटरटेन्मेंट, वायकॉम १८ आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया या बड्या चॅनल्सनी सर्वांना झटका दिला आहे. त्यांनी आपल्या टीव्ही चॅनलच्या दरात वाढ केली आहे. आता ग्राहकांना आपले आवडते चॅनल पाहायला मोठी किंमत द्यावी लागेल. वायकॉम १८ आणि नेटवर्क १८ कंपनीने आपल्या चॅनलच्या दरात २० ते २५ टक्के वाढ केली आहे, तर झी एंटरटेन्मेंटने ९ ते १० टक्के आणि सोनीने आपल्या दरात ९ ते १० टक्के वाढ केली आहे. नवीन दर १ फेब्रुवारी २०१४ पासून लागू होतील. ‘ट्राय’च्या नियमानुसार, चॅनल कंपन्या आपल्या नवीन दरांची घोषणा केल्यानंतर महिनाभरानंतर ते लागू करू शकतात.

चॅनलची दरवाढ का?

वायकॉम १८ ने आपल्या चॅनलच्या दरात मोठी वाढ केली. कारण या कंपनीने इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) डिजिटल हक्क, बीसीसीआय मीडिया हक्क, क्रिकेट दक्षिण आफ्रिका मीडिया हक्क व ऑलिम्पिक २०२४ आदी प्रमुख स्पर्धांचे हक्क खरेदी केले आहेत. कंपनीने यासाठी ३४ हजार कोटी रुपयांची मोठी रक्कम गुंतवली आहे. याची भरपाई करण्यासाठी चॅनल दरवाढ करण्याचा प्रयत्न करत आहे, तर डिस्नीने यंदा आयसीसीचे हक्क मिळवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in