भारतात सेफॉलॉजिस्ट्सची वाढती मागणी - मतदारांशी थेट संवादपासून बिग डेटा, संगणक तंत्रज्ञानाकडे वाटचाल

स्कॉटिश अभ्यासक डब्ल्यू. एफ.आर. हार्डी यांनी १९४८ साली रोनाल्ड बकमन मॅककॅलम यांच्याबरोबर गप्पा मारताना सेफॉलॉजी हा शब्द प्रथम वापरला.
भारतात सेफॉलॉजिस्ट्सची वाढती मागणी
- मतदारांशी थेट संवादपासून बिग डेटा, संगणक तंत्रज्ञानाकडे वाटचाल

नवी दिल्ली : निवडणुकीच्या निकालांबाबत भाकित करणे, ही बाब भारतासारख्या खंडप्राय, विविधतेने नटलेल्या देशात बरीच गुंतागुंतीची आणि बेभरवशाची आहे, पण गेल्या काही वर्षांत निवडणुकांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून निकालांचे अंदाज वर्तवण्याची सेफॉलॉजी नावाची विद्याशाखा भारतात मूळ धरू लागली आहे. तसेच त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणीही वाढू लागली आहे.

स्कॉटिश अभ्यासक डब्ल्यू. एफ.आर. हार्डी यांनी १९४८ साली रोनाल्ड बकमन मॅककॅलम यांच्याबरोबर गप्पा मारताना सेफॉलॉजी हा शब्द प्रथम वापरला. जागतिक स्तरावर केंब्रिज विद्यापीठातून प्रशिक्षित डेव्हिड बटलर हे आद्य सेफॉलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात. पुढे त्यांच्या बरोबरीने अँटोनी ग्रीन, मायकेल बॅरोन, रॉबर्ट मॅककेंझी, थॉमस फर्ग्युसन यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले. भारतात १९८० च्या दशकापर्यंत सेफॉलॉजीचा फारसा विकास झाला नव्हता. प्रणॉय रॉय आणि अशोक लाहिरी या दोन तरुण अर्थशास्त्रज्ञांनी १९८० च्या दशकात प्रथम शास्त्रीय पद्धतीने निवडणुकांचा अभ्यास करून निकालांचे अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली. त्यावेळी इंडियन मार्केट रिसर्च ब्युरोचे दोराब सुपारीवाला हे अध्यक्ष होते आणि रॉय त्यांच्याबरोबर काम करत होते. त्या काळात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन आणि सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटिज या संस्था प्रामुख्याने अशा प्रकारचे काम करत होत्या. आता त्यात नील्सन, टीएनएस, जीएफके मोड आदी संस्थांची भर पडली आहे. नंतर त्यांच्या बरोबरीने जी.व्ही. एल. नरसिंह राव, योगेंद्र यादव, शेखर गुप्ता आदी सेफॉलॉजिस्टही पुढे आले. लोकसभा आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी टेलिव्हिजनवरील चर्चांमध्ये हे चेहरे झळकू लागले. त्यांनी निवडणूक निकालांच्या वार्तांकनाची पद्धत बदलून टाकली. आता अनेक विद्यापीठांतून सेफॉलॉजीचे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. तेथून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना प्रसारमाध्यमे, सामाजिक संशोधन संस्था, राजकीय पक्ष, मार्केट रिसर्च संस्था आदींकडून चांगली मागणी आहे.

मात्र, सेफॉलॉजिस्ट्सचे अंदाज प्रत्येक वेळी बरोबर ठरतील असे नाही. २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश सेफॉलॉसिस्ट्नी भारतीय जनता पक्षाला विजय मिळेल, असे भाकित केले असताना प्रत्यक्ष निकाल त्यापेक्षा वेगळे आले. त्यानंतर काही राज्यांच्या मतदारांनाही या विश्लेषकांना चकवले आहे. त्यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत. भारतातील राजकीय विश्लेषण करणारी प्रसारमाध्यमे बहुतांशी कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या बाजूने झुकलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून नि:पक्षपाती विश्लेषणाची अपेक्षा करता येत नाही. शिवाय राजकीय किंवा निवडणूक सर्वेक्षण आणि एक्झिट पोल करणाऱ्या संस्था अपुऱ्या माहितीवर आणि जुन्या विश्लेषण पद्धतींवर अवलंबून राहून त्यांचे काम करत असतात.

पूर्वी सर्वेक्षण आणि एक्झिट पोल करणाऱ्या संस्था प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचून, वही-पेनद्वारे मते नोंदवून घेत असत. त्याला पेपर अँड पेन्सिल इंटरव्ह्युईंग मॉडेल (पापी) असे म्हटले जात असे. आता हेच काम संगणकाच्या मदतीने केले जाते. आता त्याला कम्प्युर-असिस्टेड पर्सनल इंटरव्ह्युईंग (कापी) असे संबोधले जाते. पण भारताच्या व्यापक भूभागात ही यंत्रे वाहून नेणे जिकिरीचे काम आहे. तेव्हा त्यात बदल करून कम्यप्युर-असिस्टेड टेलिफोनिक इंटरव्ह्युईंग (काटी) ही पद्धत विकसित होत आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या प्रसारानंतर त्यात आणखी बदल होत आहे. डेटा सायन्स नावाची स्वतंक्ष विद्याशाखाच विकसित झाली असून बिग डेटाचा निवडणूक निकालांच्या विश्लेषणात फायदा होऊ लागला आहे. आता मतदारांचे कौल नेंदवून घेताना केवळ त्यांची मते टिपली जात नाहीत, तर त्यांचे जिओ-लोकेशनही केले जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि बिग डेटा यांचा संगम होऊन निवडणूक भाकिते वर्तवणे अधिक अचूक होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in