
नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा (एआय) वापर करून बनवलेले फोटो, व्हिडीओ आणि इतर प्रचार साहित्यांवर 'एआय जनरेटेड' असा स्पष्ट उल्लेख करावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने याबाबत सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षानांना पत्र लिहिले आहे. निवडणूक प्रचारात ‘एआय’चा वाढता वापर लक्षात घेऊन आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांकडून प्रचार सुरू असून एकमेकांवर टीका आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात ‘एआय’चा वापर होत असताना निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. तत्पूर्वी, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना ‘डीप फेक’ आणि ‘एआय’च्या वापरापासून दूर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता आयोगाकडून ‘एआय’च्या वापरासंदर्भात नवी सूचना जारी करण्यात आली आहे.
‘एआय जनरेटेड’ असा उल्लेख अनिवार्य
निवडणूक प्रचारादरम्यान ‘एआय’चा वापर करून तयार करण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओचा मतदारांवर प्रभाव पडतो. त्यामुळे सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर अशा पोस्ट शेअर करताना त्यावर ‘एआय जनरेटेड’ असा स्पष्ट उल्लेख करावा, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. 'पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत', असेही निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच 'राजकीय पक्षांनी प्रचारदरम्यान ‘एआय’चा वापर जबाबदारीने करावा', अशी सूचनाही आयोगाकडून करण्यात आली आहे.