
इम्फाळ : मणिपूरमध्ये मुक्तपणे वाहतूक सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी सुरक्षा दल व आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत ४० जण जखमी झाले. दरम्यान, सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईविरोधात कुकी समाजाच्या लोकांनी अनिश्चित काळासाठी बंद पुकारला असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा दलांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे.
मणिपूर पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला आहे. सुरक्षा दलांच्या ५ वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. कुकी समाजाने रस्त्यावर दगड टाकून टायर जाळले. अनेक ठिकाणी वाहनांना आगी लावल्या. बस पलटी करून टाकल्या. त्यानंतर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर लाठीचार्ज व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
महामार्गावर गस्त सुरू
कांगपोकपी जिल्ह्यातील अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एनएच-२’मधील (इंफाळ-दिमापूर) गमघीफई आणि अन्य भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहे. या महामार्गावर पोलिसांची गस्त सुरू आहे.