पाण्याच्या प्रश्नासाठी बेमुदत उपोषण, दिल्लीच्या मंत्री आतिशी रुग्णालयात

पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले...
पाण्याच्या प्रश्नासाठी बेमुदत उपोषण, दिल्लीच्या मंत्री आतिशी रुग्णालयात
Published on

नवी दिल्ली : पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मंगळवारी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यामुळे त्यांचे उपोषण संपुष्टात आले.

प्रकृती खालावल्याने लोकनायक रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेल्या आतिशी यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेशकुमार यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी आतिशी यांच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण कमी झाले, तरीही त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. तथापि, मध्यरात्री त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सध्या त्या अतिदक्षता विभागातच असल्या तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या जात आहेत. आतिशी यांनी २१ जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आतिशी यांचे उपोषण थांबले आहे.

दिल्लीच्या हक्काचे पाणी हरयाणाने द्यावे, यासाठी आपचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहेत, असे खासदार संजय सिंह यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in