
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत परदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी रात्री उशिरा ५९ जणांच्या शिष्टमंडळाची घोषणा केली. त्यात ५१ नेते आणि ८ राजदूतांचा समावेश आहे. ‘एनडीए’चे ३१ आणि इतर पक्षांचे २० सदस्य शिष्टमंडळात आहेत, ज्यात ३ काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे.
हे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देईल. तसेच जगातील महत्त्वाच्या देशांना भेटी देऊन तिथे ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका मांडण्यात येणार आहे. हे शिष्टमंडळ २३ किंवा २४ मे रोजी निघणार असल्याचे कळते.
या शिष्टमंडळाची ७ गटांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक गटात एका खासदाराला नेता बनवले आहे. प्रत्येक गटात ८ ते ९ सदस्य आहेत. यात ६-७ खासदार, ज्येष्ठ नेते (माजी मंत्री) आणि राजदूतांचा समावेश आहे.
सर्व शिष्टमंडळांमध्ये किमान एक मुस्लिम प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे, मग तो राजकारणी असो किंवा राजदूत. अमेरिकेसह ५ देशांमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या शिष्टमंडळात असदुद्दीन ओवैसी, गुलाम नबी आझाद, रेखा शर्मा, प्रियांका चतुर्वेदी, एम. जे. अकबर, युसूफ पठाण, सलमान खुर्शीद, बांसुरी स्वराज, मिलिंद देवरा आदींचा समावेश आहे.
‘गट १’चे नेतृत्व भाजप खासदार बैजयंत पांडा, ‘गट २’चे नेतृत्व भाजपचे रविशंकर प्रसाद, ‘गट ३’चे नेतृत्व जेडीयूचे संजय कुमार झा, ‘गट ४’चे नेतृत्व शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, ‘गट ५’चे नेतृत्व शशी थरूर, ‘गट ६’चे नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोझी आणि ‘गट ७’चे नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे करत आहेत.
सर्वपक्षीय शिष्टमंडळे लवकरच प्रमुख देशांना भेट देतील व त्यांना दहशतवादाबाबत माहिती देणार आहेत.
महाराष्ट्रातून कोण?
सुप्रिया सुळे, मिलिंद देवरा, श्रीकांत शिंदे, प्रियंका चतुर्वेदी या महाराष्ट्रातील चार खासदारांचा परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळात समावेश आहे.
खालील फोटोंमध्ये बघा लिस्ट आणि कोणकोणत्या देशांना देणार भेट?
पाकिस्तानही जगभरात शिष्टमंडळ पाठवणार
भारत-पाक संघर्षात पाकिस्तानची बाजू जगभरात मांडण्यासाठी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना विविध देशात पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांना ही जबाबदारी सोपवली आहे.
‘इंडिया’ आघाडीने बहिष्कार घालावा - संजय राऊत
केंद्र सरकारच्या परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावर ‘इंडिया’ आघाडीने बहिष्कार घालावा, असे आवाहन शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केले आहे. सरकारी खर्चाने शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नाही. कारण भारताचे राजदूत परदेशात आहेत. ते आपली बाजू मांडतील. विरोधकांनी सरकारच्या सापळ्यात अडकू नये. त्यांच्या पाकसंबंधित चुकीच्या धोरणावर पांघरूण घालू नये, असे आवाहन राऊत यांनी केले.