इंडिया आघाडीच्या जागावाटप वाटाघाटी १३ सप्टेंबरला पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक

संसदेचे हे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबर रोजी सुरू होत आहे
इंडिया आघाडीच्या जागावाटप वाटाघाटी १३ सप्टेंबरला पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक

नवी दिल्ली : इंडिया आघाडीचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपबाबतच्या वाटाघाटी येत्या १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत होणार आहेत. या बैठकीला १४ सदस्यीय समन्वय समिती देखील उपस्थित राहणार आहेत.

मंगळवारी संसदेत प्रतिनिधित्व करणाऱ्या जवळजवळ १४ पक्षांचे नेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीला उपस्थित होते. तेव्हा या बैठकीत बेरोजगारी, महागार्इ, मणिपूर हिंसाचार हे प्रश्न संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनात उपस्थित करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. संसदेचे हे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. सरकारने या अधिवेशनाचा अजेंडा मात्र गुलदस्त्यात ठेवला आहे. इंडिया आघाडीत आता सुमारे ३० पक्ष गोळा झाले आहेत. त्यांनी देशातील विविध भागात एकत्रितपणे सार्वजनिक सभा घेण्याचा पण केला आहे. सनातन धर्मावरील विधानाबाबत देखील या बैठकीत निर्णय झाला. सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात या विषयावर कोणतेही भाष्य न करता सर्वांनी आपापल्या सरकारची कामे जनेतसमोर मांडावित आणि भाजपचे अपयश जनतेच्या नजरेला आणून द्यावे, असा निर्णय झाला.

logo
marathi.freepressjournal.in